यवतमाळ: काँग्रेसच्या दोन दिग्गज माजी मुख्यमंत्र्यांच्या गावातच भाजपानं विजय मिळवल्यानं हा चर्चेचा विषय ठरत आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील गहुली हे स्व. वसंतराव नाईक आणि स्व. सुधाकरराव नाईक या महाराष्ट्राच्या दोन मुख्यमंत्र्यांचे गाव आहे. या गावात गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती. अखेर भाजपनं राष्ट्रवादी काँग्रेसच्या या बालेकिल्ल्याला खिंडार पाडलंय. गहुली ग्रामपंचायत आमदार निलय नाईक यांच्या ताब्यात गेल्यानं याची सगळीकडेच जोरदार चर्चा आहे. (Maharashtra Gram Panchayat Election 2021 : BJP In The Village Of Two Veteran Former Chief Ministers)
1949 पासून बिनविरोध असलेल्या गहुली या गावी प्रथमच होऊ घातलेल्या निवडणुकीत भाजपाचे 7 पैकी 7 उमेदवार निवडून आलेत. त्यामुळे राष्ट्रवादीच्या या गडाला खिंडार पडल्याची चर्चा आहे. गेल्या काही दिवसांपासून निलय नाईक (Nilay Naik vs Indranil Naik) यांची लढत त्यांचे चुलत बंधू आणि राष्ट्रवादीचे उमेदवार इंद्रनिल नाईक (Indranil Naik) यांच्याशी होत आली आहे. हे दोघेही माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या घराण्यातील आहेत.
कोण आहेत निलय नाईक?
निलय नाईक यांनी काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश केला होता. भाजपने त्यांना विधान परिषदेवर पाठवलं. निलय नाईक हे विधान परिषदेचे विद्यमान आमदार आहेत. निलय नाईक यांनी 2009 मध्ये अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. मात्र त्यावेळी त्यांचा पराभव झाला होता. यवतमाळ जिल्ह्यातील पुसद मतदारसंघ गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राहिलाय. नाईक परिवार राष्ट्रवादीशी एकनिष्ठ मानला जात होता. दिवंगत माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांचं हे घराणं आहे.
नाईक घराण्यात काय आहे वाद?
पुसद येथील नाईक घराण्याचा गेल्या 70 वर्षांपासून यवतमाळच्या राजकारणात वरचष्मा राहिलाय. वसंतराव नाईक यांच्यानंतर त्यांचे पुतणे सुधाकरराव आणि विद्यमान स्थितीत नाईक घराण्याचा वारसा चालवणाऱ्या मनोहरराव नाईकांनी घराण्यातील अंतर्गत वाद कधीही बाहेर नेला नव्हता. काही वर्षांपूर्वी पुसद विधानसभेची जागा वसंतराव नाईक यांचे ज्येष्ठ पुत्र अविनाश नाईक लढवणार असल्याची चर्चा होती. त्यावरून नाईक कुटुंबात अंतर्गत वाद असल्याचीही चर्चा होती. दरम्यान, नाईकांच्या बंगल्याबाहेर याबाबत काहीही आले नाही. मात्र, गेल्या काही वर्षांत मनोहर नाईक व त्यांचे पुतणे नीलय नाईक यांच्यातील वाद वाढतच गेलाय.
संबंधित बातम्या
महाराष्ट्र ग्रामपंचायत निकाल 2021 : आपली इज्जत आपणच राखावी, देवेंद्र फडणवीसांचा शिवसेनेवर हल्लाबोल