
Ambadas Danve on Rajendrasingh Naik Nimbalkar : फलटण येथील महिला डॉक्टर आत्महत्याप्रकरणात गेल्या 24 तासात अनेक घडामोडी घडल्या. काल भल्या पहाटे 4 वाजता आरोपी प्रशांत बनकर याला सातारा ग्रामीण पोलिसांनी अटक केली. त्यानंतर पोलीस निरीक्षक गोपाल बदणे शरण आला. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यापूर्वीच उद्धव सेनेचे नेते अंबादास दानवे यांनी माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर निशाणा साधला आहे.
दानवेंची सोशल मीडियावर पुराव्याची भली मोठी पोस्ट
याप्रकरणात एका माजी खासदार आणि त्याच्या पीएने महिला डॉक्टरवर दबाव टाकल्याचा आरोप दानवे यांनी काल केला होता. त्यावर पुराव्याशिवाय कुणावरही आरोप करु नयेत अशी प्रतिक्रिया रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी दिली होती. आज दानवे यांनी एक्स या सोशल मीडियावर भली मोठी पोस्ट लिहित निंबाळकर यांना कांगावा करू नका, हा घ्या पुरावा असे सूतोवाच केले.
दानवेंची ती पोस्ट व्हायरल
उद्धव ठाकरे सेनेचे अंबादास दानवे यांनी एक्सवर एक पोस्ट लिहीत निंबाळकरांना पुराव्याची यादी दिली आहे.
“आज मुख्यमंत्री त्या माणसासोबत व्यासपीठावर बसतील ज्याने आपले कर्तव्य पार पाडणाऱ्या एका महिला डॉक्टरवर फिटनेसबाबत दबाव टाकला. ‘तो मी नव्हेच’ म्हणणाऱ्या निंबाळकरांचा या डॉक्टर प्रकरणाशी संबंध कसा ते पहा..
१. मल्हारी अशोक चन्ने (४२) हा आरोपी रक्तदाब वाढल्या कारणाने टूडी इकोसाठी मृत महिला डॉक्टरने रेफर केला होता. हे रेफरल दिल्यावर खासदार साहेबांशी बोला.. असे सांगत दोन पीए या महिला डॉक्टरकडे आले होते. आत्महत्या करणाऱ्या महिला डॉक्टरने याविषयी आपल्या जबाबात पहिल्या पानावर ओळ क्रमांक २१ ते ३१ यावर हे स्पष्ट नमूद केले आहे.
२. याच स्टेटमेंटमध्ये खासदार महोदयांनी ‘आपण बीडचे असल्याने आरोपीला ‘फिट’ देत नाहीत, अशी पोलिसांची कंप्लेंट आहे’ असे सांगितल्याचे या महिला डॉक्टरने स्पष्टपणे नमूद केले आहे.
३. दुसरा पुरावा म्हणजे फलटण जेएमएफसी कोर्टात दाखल झालेल्या खटल्याची माहिती सांगणारा हा फोटो. वरील आरोपी चन्ने याच्या विरोधात स्वराज ग्रीन पॉवर अँड फ्युल लिमिटेड, उपळवे या कंपनीने दावा दाखल केला होता. ज्याचा Filing number SCC/2433/2024 तर Case Registration Number SCC/1883/2024 हा आहे. ही स्वराज ग्रीन पॉवर अँड फ्युल कंपनी निंबाळकर यांच्या मालकीची आहे, हे निंबाळकर यांच्या प्रोफाईलवरच नमूद आहे.
४. महिला डॉक्टरला फोनवरून बोलणे करून देणारे दोन पीए म्हणजे राजेंद्र शिंदे आणि रोहित नागटीळे! ”
असे सविस्तर चार मुद्दे लिहून त्यांनी निंबाळकरांचा या प्रकरणाशी कसा संबंध आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला. तर आता एवढं दिल्यावर तापास करणाऱ्या पोलिसांनी हे पण सांगावे की डीवायएसपी राहुल धस आणि पी आय अनिल महाडिक यांचा यात काय सहभाग होता! नाहीतर मला हे सांगावं लागेल, असा इशाराही दानवेंनी दिला.
आज मुख्यमंत्री @Dev_Fadnavis त्या माणसासोबत व्यासपीठावर बसतील ज्याने आपले कर्तव्य पार पाडणाऱ्या एका महिला डॉक्टरवर फिटनेसबाबत दबाव टाकला. ‘तो मी नव्हेच’ म्हणणाऱ्या निंबाळकरांचा या डॉक्टर प्रकरणाशी संबंध कसा ते पहा..
१. मल्हारी अशोक चन्ने (४२) हा आरोपी रक्तदाब वाढल्या कारणाने… pic.twitter.com/N2gmKbLplb
— Ambadas Danve (@iambadasdanve) October 26, 2025
अंबादास दानवे यांचा महायुतीवर टीका
फलटण येथील महिला डॉक्टर मृत्यूप्रकरणात अंबादास दानवे यांनी सरकारवर निशाणा साधला. महायुती सरकार चुकीची कामे करणाऱ्यांना पाठीशी घालणारे आहेच, हे नवीन राहिलेले नाही. एका कर्तव्यदक्ष डॉक्टरची किंमत सरकारच्या लेखी काय आहे हे आज देवेंद्र फडणवीस फलटणला गेल्यावर सगळ्या महाराष्ट्राला कळणार आहेच.कायद्याचे न उरले भान, देवाभाऊंच्या सरकारमध्ये महिलांचा अपमान अशी पोस्ट त्यांनी केली आहे.