
रवींद्र जडेजाने रणजी ट्रॉफी सामन्यांमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. सौराष्ट्रकडून खेळताना रवींद्र जडेजाने दिल्लीविरुद्ध पहिल्या डावात पाच विकेट घेतल्या होत्या. जडेजाने दिल्लीविरुद्ध 17.4 षटके टाकली आणि अवघ्या 66 धावा देत पाच बळी घेतले. तर दुसऱ्या डावात पुन्हा एकदा 6 गडी टीपले.

रवींद्र जडेजाच्या या कामगिरीमुळे दिल्लीला पहिल्या डावात फक्त 188 धावा करता आल्या. दिल्लीकडून ऋषभ पंत मैदानात उतरला आहे. पण त्यालाही साजेशी कामगिरी करता आली नाही. ऋषभ पंत 10 चेंडूत फक्त एक धाव करून बाद झाला.

रवींद्र जडेजाने सनथ सांगवान, यश धुल, दिल्लीचा कर्णधार आयुष बधोनी, हर्ष त्यागी आणि नवदीप सैनी यांच्या विकेट्स मिळवण्यात यश मिळवले. यासह रवींद्र जडेजाने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 35 व्यांदा एका डावात पाच विकेट्स घेण्याचा पराक्रम केला.

जडेजाने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 550 हून अधिक विकेट घेण्याचा विक्रम केला आहे. दुसरीकडे, फलंदाजीतही रवींद्र जडेजाने चांगली कामगिरी केली. त्याने 36 चेंडूत 3 षटकार आणि 2 चौकारांच्या मदतीने 38 धावा केल्या.

चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी निवडलेल्या टीम इंडियाचा निम्मा संघ रणजी ट्रॉफीमध्ये खेळत आहेत. मात्र जडेजा वगळता इतरांची कामगिरी निराशाजनक राहिली आहे. रोहित शर्मा, शुबमन गिल, यशस्वी जयस्वाल, ऋषभ पंतही सपशेल अपयशी ठरले.