Punjab Election 2022: गळाभेट आणि बिर्याणी खाल्ल्याने संबंध सुधारत नाहीत, मनमोहन सिंग यांची मोदींवर बोचरी टीका

| Updated on: Feb 17, 2022 | 5:46 PM

पंजाब (Punjab) विधानसभा निवडणुकीचा निकाल लागण्यापूर्वीच माजी पंतप्रधान आणि काँग्रेस नेते मनमोहन सिंग (Manmohan Singh) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यावर जहरी टीका केली आहे.

Punjab Election 2022: गळाभेट आणि बिर्याणी खाल्ल्याने संबंध सुधारत नाहीत, मनमोहन सिंग यांची मोदींवर बोचरी टीका
गळाभेट आणि बिर्याणी खाल्ल्याने संबंध सुधारत नाहीत, मनमोहन सिंग यांची मोदींवर बोचरी टीका
Follow us on

नवी दिल्ली: पंजाब (Punjab) विधानसभा निवडणुकीचा निकाल लागण्यापूर्वीच माजी पंतप्रधान आणि काँग्रेस नेते मनमोहन सिंग (Manmohan Singh) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यावर जहरी टीका केली आहे. भाजपच्या नेतृत्वातील सरकारला आर्थिक धोरणांची समज नाही. केवळ देशांतर्गत धोरणातच भाजप सरकार अपयशी ठरलेलं नाही तर परराष्ट्र धोरणातही केंद्र सरकार अपयशी ठरलं आहे. चीन आपल्या सीमेवर येऊन बसला आहे अन् इकडे ते दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे. राजकारण्यांची गळाभेट घेतल्याने आणि निमंत्रण नसताना बिर्याणी खाल्ल्याने संबंध सुधारत नसतात, असा खोचक टोला मनमोहन सिंग यांनी मोदींना लगावला आहे. आजची परिस्थिती चिंताजनक आहे. कारण सरकारच्या धोरणामुळे कोरोना काळात महागाई, बेरोजगारी वाढत आहे. आपण केलेल्या चुका निस्तरण्याऐवजी मोदी वारंवार माजी पंतप्रधान नेहरूंना जबाबदार धरून टीका करत आहेत, असा चिमटाही मनमोहन सिंग यांनी काढला आहे.

काँग्रेसने मनमोहन सिंग यांचा एक व्हिडीओ व्हायरल केला आहे. त्यात त्यांनी मोदींवर जोरदार हल्ला चढवला आहे. आमचे लोक चांगले काम करत आहेत. पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेच्या मुद्द्यावरून भाजपने मुख्यमंत्री चरणजीत सिंग आणि पंजाबच्या लोकांचा अपमान करण्याचा प्रयत्न केला आहे. भाजपच्या सत्तेत श्रीमंत लोक श्रीमंतच राहिले. तर गरीब हे गरीबच राहिले. या सरकारचा राष्ट्रवाद जितका बोगस आहे तितकाच धोकादायक आहे. फोडा आणि राज्य करा या इंग्रजांच्या धोरणावर यांचा राष्ट्रवाद टिकून आहे. संवैधानिक संस्थांना कमकुवत केलं जात आहे. परराष्ट्र धोरणावरही हे सरकार फेल गेलं आहे, असं मनमोहन सिंग यांनी सांगितलं.

म्हणून नेहरुंना जबाबदार धरलं जातं

कोरोना काळातील सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे लोकांना आर्थिक, बेरोजगारी आणि महागाईच्या समस्यांना सामोरे जावं लागत आहे. 7.5 वर्ष सरकार चालवूनही या सरकारला आपल्या चुका मान्य होत नाही. आपल्या चुका सुधाराव्या वाटत नाही. पण माजी पंतप्रधान पंडित नेहरू यांना अजूनही जबाबदार धरत आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.

गप्पा मारणं सोपं असतं

केवळ चेहरा बदलल्याने परिस्थिती बदलत नसते हे सरकारने समजून घ्यावं. जे सत्य आहे ते नेहमीच कोणत्या ना कोणत्या स्वरुपात उजेडात येत असतं. मोठमोठ्या गप्पा मारणं सोपं असतं. मात्र, त्या घोषणा वास्तवात उतरवणं तेवढंच कठिण असतं, असे चिमटेही त्यांनी मोदींना काढले.

म्हणून चुका कमी होत नसतात

पंतप्रधानांची एक प्रतिष्ठा असते. हे मान्य. पण इतिहासातील चुकांकडे बोट ठेवल्याने आपल्या चुका कमी होत नसतात. माझ्या दहा वर्षाच्या काळात मी स्वत: अखंड बडबड करण्याऐवजी कामच कसे बोलेल यावर भर दिला. यांनी तर राजकीय लाभ उठवण्यासाठी सत्यही दडवून ठेवण्याचं काम केलं. आम्ही कधी देशाची प्रतिष्ठा कमी होऊ दिली नव्हती, असंही सिंग यांनी म्हटलं आहे.

 

संबंधित बातम्या:

Punjab Election 2022: ना सिद्धू, ना जाखड, चरणजीत सिंग चन्नीच काँग्रेसचा पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाचा चेहरा, राहुल गांधी यांची मोठी घोषणा

Punjab Election 2022 : पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाबाबत राहुल गांधींचं मोठं वक्तव्य, कोण असणार मुख्यमंत्रीपदाचा चेहरा?

Assembly election 2022 | पंजाब काँग्रेसमधील चन्नी-सिद्धू वाद चव्हाट्यावर, उमेदवारीवरून मतभेद