
अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांचा मुंबईतील पाली हिल परिसरातील बंगला गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चेत आहे. राज कपूर यांच्या ‘कृष्ण राज’ प्रॉपर्टीवर रणबीर-आलियाने सहा मजली आलिशान बंगला बांधला आहे. गेल्या तीन वर्षांपासून या बंगल्याचं बांधकाम सुरू आहे. तब्बल 250 कोटी रुपयांच्या या बंगल्याचा एक व्हिडीओ नुकताच सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. या बंगल्याच्या समोरील इमारतीतून हा व्हिडीओ शूट केल्याचं पहायला मिळालं. लेक राहासह आलिया आणि रणबीर या नवीन घरात राहायला गेल्याचं वृत्त देत पापाराझींनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता. परंतु आता त्यावरून आलियाने तीव्र संताप व्यक्त केला आहे. इन्स्टाग्रामवर भलीमोठी पोस्ट लिहित त्याने या गोष्टीचा समाचार घेतला आहे.
‘मुंबईसारख्या शहरात जागा मर्यादित असल्याचं मी समजू शकते. कधीकधी तुमच्या खिडकीतून दुसऱ्या व्यक्तीचं घरही दिसतं. पण कोणाच्याही खासगी निवासस्थानाचा व्हिडीओ काढून तो ऑनलाइन पोस्ट करण्याचा अधिकार कोणालाही नाही. आमच्या निर्माणाधीन घराचा व्हिडीओ रेकॉर्ड करून तो अनेक माध्यमांनी सोशल मीडियावर पोस्ट केला आहे, तेसुद्धा आमच्या परवागनी किंवा माहितीशिवाय. हे स्पष्टपणे एखाद्याच्या खासगी आयुष्यावरील अतिक्रमण आणि सुरक्षेचा गंभीर प्रश्न आहे. एखाद्याच्या खासगी जागेचा व्हिडीओ किंवा फोटो त्यांच्या परवागनीशिवाय काढणं हा ‘कंटेंट’ असू शकत नाही. याला उल्लंघन म्हणतात. या गोष्टीचं कधीच समर्थन करू नये’, अशा शब्दांत तिने फटकारलं आहे.
या पोस्टमध्ये तिने पुढे लिहिलं, ‘एकदा विचार करा, तुमच्या माहितीशिवाय तुमच्या घरातील व्हिडीओ सार्वजनिकरित्या शेअर केल्यावर तुम्ही ते सहन कराल का? त्यामुळे मी नम्र आणि ठामपणे विनंती करते की, जर तुम्हाला ऑनलाइन असा काही कंटेंट दिसला तर कृपया ते फॉरवर्ड किंवा शेअर करू नये. त्याचप्रमाणे हे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करणाऱ्या मीडियातील आमच्या मित्रमैत्रिणींना मी हे लगेच काढून टाकण्याची विनंती करते.’
आलियाच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्याचसोबत आलियाची आई आणि अभिनेत्री सोनी राजदान यांनी कमेंटमध्ये म्हटलंय, ‘धक्कादायक म्हणजे एखाद्या पब्लिकेशनने असं काहीतरी करण्याचा विचार केलाय. लोकांमध्ये समजूतदारपणा येईल आणि लगेच व्हिडीओ काढून टाकतील अशी मला अपेक्षा आहे. मग ते कोणीही असोत. मला खात्री आहे की लोक अधिक जबाबदारीने वागतील.’