अंजली तेंडुलकर, गौरी खानने स्टाफसाठी घेतला अलिशान फ्लॅट, किंमत पाहून तुम्हालाही बसेल धक्का
सेलिब्रिटी आणि अतिश्रीमंत लोक त्यांच्यासाठी नव्हे तर त्यांच्या घरी काम करणाऱ्यांसाठी घरं घेत आहेत. सचिन तेंडुलकरची पत्नी अंजली तेंडुलकर, शाहरुख खानची पत्नी गौरी खान यांनी त्यांच्या स्टाफसाठी घरं घेतली आहेत.

काही सेलिब्रिटींचा थाटच निराळा असतो. ते फक्त स्वत:साठीच कोट्यवधी रुपयांची आलिशान घरं खरेदी करत नाहीत, तर त्यांच्या टीम आणि स्टाफ मेंबर्ससाठीही ते रिअल इस्टेटमध्ये लाखो रुपयांची गुंतवणूक करतात. मुंबईसारख्या महागड्या शहरात आपलं घर असणं, हे सर्वसामान्यांसाठी एखाद्या स्वप्नासारखंच आहे. अशा मुंबईत काही सेलिब्रिटी त्यांच्यासाठी नव्हे तर त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी महागडे अपार्टमेंट खरेदी करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरची पत्नी अंजली तेंडुलकरपासून ते अभिनेता शाहरुख खानची पत्नी गौरी खानपर्यंत अनेकांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी घरं खरेदी केली आहेत.
अंजली तेंडुलकरने विरारमध्ये एक अपार्टमेंट खरेदी केला आहे. घरकाम करणाऱ्या एका कर्मचाऱ्यासाठी तिने हे अपार्टमेंट खरेदी केलं आहे. तर गौरी खाननेही तिचा पाली हिल इथला अपार्टमेंट एका स्टाफसाठी भाडेतत्त्वावर दिला आहे. फक्त अंजली आणि गौरीच नव्हे तर इतरही नामांकित व्यक्ती आणि भरभक्कम पैसा कमावणारे काहीजण त्यांच्या घरात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी घरं विकत घेत आहेत किंवा आपलीचं घरं त्यांना भाडेतत्त्वावर देत आहेत.
अंजली तेंडुलकरने यावर्षी ऑगस्ट महिन्यात विरारमध्ये 32 लाखांचा अपार्टमेंट विकत घेतला. ‘झॅपकी डॉटकॉम’ने मिळवलेल्या मालमत्ता नोंदणी कागदपत्रांनुसार, विरारमधील पेनिन्सुला हाइट्स नावाच्या इमारतीत अंजली तेंडुलकरने अपार्टमेंट खरेदी केलं होतं. 391 चौरस फूटचं हे अपार्टमेंट इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर आहे. हा व्यवहार 30 मे 2025 रोजी झाला होता आणि त्यासाठी 1.92 लाख रुपये स्टँप ड्युटी आणि 30 हजार रुपये नोंदणी शुल्क आकारण्यात आले होते. महिला घर खरेदीदार म्हणून अंजलीने स्टँप ड्युटीवर 1 टक्के सवलतीचा लाभ घेतला. महाराष्ट्रात महिला घरमालकांना हा लाभ मिळतो. राज्यातील शहर आणि जिल्ह्यानुसार, स्टँप ड्युटी दर पाच ते सात टक्केदरम्यान असतो.
प्रसिद्ध इंटेरिअर डिझाइनर आणि शाहरुखची पत्नी गौरी खानने जून 2025 मध्ये मुंबईतील खास पश्चिम इथं तिच्या कर्मचाऱ्यासाठी 2 बीचएके अपार्टमेंट भाड्याने घेतलं होतं. या अपार्टमेंटचं भाडं 1.35 लाख रुपये होतं. शाहरुख खान आणि त्याचे कुटुंबीय सध्या पाली हिल इथल्या बंगल्यात राहत आहेत. ‘मन्नत’ बंगल्याचे मजले वाढवण्याचं काम सुरू असल्याने ते काही दिवसांपासून पाली हिलमध्ये राहत आहेत. याच घरापासून फक्त 100 मीटर अंतरावर गौरीने स्टाफसाठी घर भाड्याने घेतलंय.
पाली हिलमधल्या पंकज प्रीमायसेस को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडमधील या अपार्टमेंटचा कार्पेट एरिया 725 चौरस फूट आहे. त्यात एक हॉल, किचन, दोन बेडरुम आणि दोन वॉशरुम्स आहेत. करारानुसार, तिच्या कर्मचाऱ्यांना 10 एप्रिल 2025 ते 9 एप्रिल 2028 पर्यंत तिथे राहण्याची परवानगी आहे. इतकंच नव्हे तर एका आघाडीच्या फार्मा कंपनीच्या मालकाने या वर्षाच्या सुरुवातीला वांद्रे इथं सुमारे 9 कोटींना 1000 चौरस फूट आकाराचं अपार्टमेंट खरेदी केलं होतं. स्वयंपाक करणारे आणि इतर कर्मचारी जवळपास राहावेत, म्हणून त्यांनी हे अपार्टमेंट खरेदी केलं आहे.
