घाटकोपरची भाषा गुजराती, गिरगावात हिंदी…RSS चे भैय्याजी जोशींच्या मुक्ताफळांनी वाद पेटला, मुख्यमंत्री काय निर्णय घेणार?

RSS Leader Bhaiyyaji Joshi Statement : मुंबईत एका कार्यक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांनी मुक्ताफळं उधळली. त्यांनी मराठी विषयी केलेल्या वक्तव्याने एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे विरोधकांच्या आरोपांना आपोआप बळकटी मिळत असल्याचे चित्र आहे.

घाटकोपरची भाषा गुजराती, गिरगावात हिंदी...RSS चे भैय्याजी जोशींच्या मुक्ताफळांनी वाद पेटला, मुख्यमंत्री काय निर्णय घेणार?
भैय्याजी जोशी यांच्या वक्तव्याने वाद
Image Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Mar 06, 2025 | 12:22 PM

मुंबईत एका कार्यक्रमादरम्यान राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे माजी सहकार्यवाह भैय्याजी जोशी यांनी मराठी भाषेविषयी मुक्ताफळं उधळली. ते घाटकोपर येथील एका कार्यक्रमात मुंबईच्या भाषिक वैशिष्ट्यावर बोलत होते. पण बोलताना ते असे काही बोलून गेले की, त्यामुळे मराठी माणसाच्या भावना दुखावल्या गेल्या. भाजप सरकार आल्यापासून मुंबई तोडण्याची भाषा होत आहे, मुंबईतील मराठी माणसांवर अन्याय होत असल्याचा आरोप सातत्याने विरोधक करत आहेत. त्यात भैय्याजींच्या वक्तव्याने फोडणी बसली आहे.

घाटकोपर परिसराची भाषा गुजराती

“मुंबईत येणाऱ्यांनी मराठी शिकलं पाहिजे असे काही नाही. इथे वेगवेगळ्या भाषा बोलल्या जातात. मुंबईतील घाटकोपर परिसराची भाषा ही गुजराती आहे. मुंबईची कुठलीही एक भाषा नाही. इथे अनेक भाषा बोलल्या जातात.” असे वक्तव्य भैय्याजी यांनी केले आणि वाद उफळला. विद्याविहार येथील एका कार्यक्रमात ते बोलत होते. त्यानंतर आज त्याचे पडसाद उमटले. खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. भैय्याजी यांच्याविरोधात कारवाईचा मुद्दा लावून धरला.

मराठी शिकलं पाहिजे असे काही नाही

“मुंबईची कुठलीही एक भाषा नाही. मुंबईच्या अनेक भाषा आहेत. वेगवेगळ्या परिसरात विविध भाषा बोलल्या जातात. घाटकोपर परिसराची भाषा गुजराती आहे. तर गिरगावात हिंदी बोलणारे कमी आहेत. तिथे तुम्हाला मराठी भाषा बोलणारे लोक आढळतील. मुंबईत येणार्‍या व्यक्तीने मराठी शिकलं पाहिजे असं काही नाही.” असं वक्तव्य करून त्यांनी वाद ओढावून घेतला.

राज्य सरकारने भूमिका स्पष्ट करावी

दरम्यान भैय्याजी जोशी यांच्या वक्तव्याचा भाव समजून घ्या असे आमदार राम कदम म्हणाले. तर जोशींचे कृत्य हे औरंगजेबापेक्षा भयंकर आहे, जोशी यांचं वक्तव्य महाराष्ट्राचा अपमान नाही का? त्यांचे वक्तव्य म्हणजे राजद्रोह असल्याचा संताप संजय राऊत यांनी व्यक्त केला. तर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले. मुंबईची भाषा मराठीच आहे. सत्ताधाऱ्यांनी या वक्तव्यावर भूमिका स्पष्ट करावी असे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार म्हणाले.