
आज विधिमंडळ परिसरात उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली. सभागृहात जात असताना या दोघांनी एकाच लिफ्टमधून प्रवास केला. यावर शिवसेना ठाकरे गटाच्य नेत्या सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. उद्धवसाहेब ठाकरे यांना एका ताटात जरी घेऊन देवेंद्र फडणवीस जेवले. तरी आम्ही देवेंद्र फडणवीस या नावावर आता फुली मारली आहे. म्हणजे हा विषय आमच्यासाठी संपला आहे. या भेटीचा वेगळा असा काही अर्थ नाही. योगायोगाने आपल्याकडे लिफ्ट पाच-पन्नास नाहीत. त्यामुळे एकाच लिफ्टमधून ते गेले. पण याचा अर्थ लगेच ते एकत्र आले असं होत नाही, असं सुषमा अंधारे म्हणाल्या आहेत.
चंद्रकांत पाटील आणि त्यांच्या पक्षाने आम्हाला विश्वासघाताचे विषारी घोट पाजले आहेत. हे विश्वासघाताचे विषारी घोट सुद्धा पचवून आम्ही परत उभा राहिलो आहे. माध्यमांच्या समोर जरी चंद्रकांत पाटील यांनी चॉकलेट दिले असले तरी आमची विनंती आहे की, तुम्ही जनतेला आश्वासनांचे चॉकलेट देऊ नका. तुमच्या अशा चॉकलेटने आम्ही तुम्हाला जनतेच्या बाबत प्रश्न विचारणार नाही या भ्रमात राहू नका, असंही सुषमा अंधारे म्हणाल्या आहेत.
‘मेरा यार, मेरा दुश्मन’ हा चित्रपट पुन्हा एकदा बघून घ्या. याचा या भेटीचा काहीही परिणाम होणार नाही. वर्धापन दिनादिवशी उद्धव साहेब ठाकरे यांनी भूमिला स्पष्ट केली आहे. छगन भुजबळ साहेबांनाबाबत सुद्धा भूमिका स्पष्ट केली आहे. कुठली चर्चा झाली नाही. आम्ही कुणासोबत जाणार नाही म्हणजे जाणार नाही, असं सुषमा अंधारे यांनी सांगितलं आहे.
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज पहिला दिवस आहे. अशातच आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची भेट झाली आहे. देवेंद्र फडणवीस आणि प्रविण दरेकर सभागृहात जाण्यासाठी विधिमंडळातील लिफ्टजवळ उभे होते. याचवेळी त्या लिफ्टजवळ माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि ठाकरे गटाचे नेते मिलिंद नार्वेकर पोहोचले. मग हे सगळे नेते एकत्र लिफ्टने सभागृहात जाण्यासाठी निघाले. उद्धव ठाकरे- देवेंद्र फडणवीस हे लिफ्टमध्ये गेले. इतक्यात भाजपचे नेते प्रविण दरेकर हे त्या लिफ्टमध्ये जाऊ लागले. मात्र इतक्यात ‘याला आधी बाहेर काढा’ असं उद्धव ठाकरे म्हणाले.