IND vs PAK : टीम इंडिया 14 सप्टेंबरला खेळणार नाही, पाकिस्तान विरुद्धच्या सामन्याबाबत माजी खेळाडूने सांगूनच टाकलं

Asia Cup 2025 Kedar Jadhav : आशिया कप 2025 स्पर्धेत भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील सामना हा 14 सप्टेंबर रोजी दुबईतील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये खेळवण्यात आला आहे. मात्र या सामन्याला तीव्र विरोध आहे. या सामन्याबाबत माजी क्रिकेटर केदार जाधव काय म्हणाला? जाणून घ्या.

IND vs PAK : टीम इंडिया 14 सप्टेंबरला खेळणार नाही, पाकिस्तान विरुद्धच्या सामन्याबाबत माजी खेळाडूने सांगूनच टाकलं
Kedar Jadhav On IND vs PAK
Image Credit source: ANI
| Updated on: Aug 18, 2025 | 7:47 PM

भारताने पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानची चांगलीच मस्ती जिरवली. भारताने ऑपरेशन सिंदरद्वारे पाकिस्तानला जन्माची अद्दल घडवली. भारतीय सैन्याने पाकिस्तानचा प्रत्येक हल्ला परतवून लावला. तसेच भारताने पाकिस्तानसोबतचे बहुतांश व्यवहार बंद करत शेजाऱ्यांची आर्थिक कोंडी केली. भारताने जवळपास प्रत्येक बाबतीत पाकिस्तानवर बहिष्कार घातला. याचा परिणाम हा खेळावरही पाहायला मिळाला. नुकत्याच झालेल्या वर्ल्ड लिजेंड्स चॅम्पियन स्पर्धेतील पाकिस्तान विरूद्धच्या दोन्ही सामन्यांवर भारताने बहिष्कार घातला. भारताने साखळी आणि बाद फेरीत पाकिस्तान विरुद्ध खेळण्यास नकार दिला. त्यानंतर आता आशिया कप स्पर्धेत उभयसंघात होणाऱ्या सामन्यालाही वाढता विरोध आहे. या सामन्यावरुन भारताचा माजी ऑलराउंडर आणि भाजप नेता केदार जाधव याने प्रतिक्रिया दिली आहे.

पहलगाम हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान दोन्ही शेजारी देशातील संबंध खूप ताणले गेले आहेत. मात्र त्यानंतरही आशिया कप 2025 स्पर्धेसाठी या दोन्ही देशाच्या क्रिकेट संघाना एकाच गटात ठेवण्यात आलं आहे. भारत-पाकिस्तान एकाच गटात असल्याने दोन्ही संघाचा सामना होणार असल्याचं स्पष्ट आहे. उभयसंघातील हा सामना 14 सप्टेंबरला होणार आहे. तसेच या दोन्ही संघात या स्पर्धेत आणखी 2 सामने होण्याची शक्यता आहे. मात्र पहलगाम हल्ल्यानंतर भारतीयांच्या भावना फार तीव्र आहेत.

पाकिस्तान विरुद्ध खेळायचं नाही म्हणजे नाहीच, ही भूमिका भारतीय चाहत्यांची आणि खेळाडूंचीही आहे. मात्र केंद्र सरकार आणि बीसीसीआयकडेच याबाबत अतिंम निर्णय घेण्याचा अधिकार आहे. पाकिस्तान विरूद्धच्या सामन्याला वाढता आणि तीव्र विरोध आहे. यावरुन केदार जाधवने काय म्हटलं? हे जाणून घेऊयात.

केदार जाधव काय म्हणाला?

“टीम इंडियाने हा सामना खेळूच नये, असं मला वाटतं. जिथपर्यंत भारताचा प्रश्न आहे, भारत हा सामना जिथे खेळेल तिथे जिंकेलच. मात्र हा सामना कोणत्याही स्थिती खेळायला नको आणि ते (भारतीय खेळाडू) खेळणार नाहीत हे मी दाव्याने सांगतो”, असं केदारने म्हटलं. केदारने माध्यमांशी संवाद साधताना आशिया कप स्पर्धेतील या महामुकाबल्याबाबत प्रतिक्रिया दिली.

माजी ऑलराउंडरने स्पष्टच सांगितलं

दरम्यान आशिया कप 2025 स्पर्धेतील एकूण 8 संघांना 4-4 नुसार 2 गटांमध्ये विभागण्यात आलं आहे. ए ग्रुपमध्ये टीम इंडिया आणि पाकिस्तान व्यतिरिक्त यजमान यूएई आणि ओमानचा समावेश आहे. तर बी ग्रुपमध्ये अफगाणिस्तान, श्रीलंका, बांगलादेश आणि हाँगकाँगचा समावेश आहे.