
आयपीएल 2026 स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच कोलकाता नाईट रायडर्स संघाची धावाधाव सुरू झाली आहे. मागच्या पर्वात सुमार कामगिरी केल्यानंतर पुन्हा एकदा नव्याने संघ बांधला होती. मिनी लिलावात काही खेळाडू संघात सामील करून घेतले. गोलंदाजी आणि फलंदाजीचा समतोल राखून हा संघ बांधला होता. पण कोलकाता नाईट रायडर्स संघाची गोलंदाजीची बाजू आता ढासळल्याचं दिसत आहे. भारत बांग्लादेश यांच्यात वादामुळे मुस्तफिझुर रहमानला संघातून काढलं. त्यामुळे त्याची रिप्लेसमेंट शोधण्यासाठी केकेआर फ्रेंचायझीला टी20 वर्ल्डकप स्पर्धा संपेपर्यंत वाट पाहावी लागली. या स्पर्धेत चांगली कामगिरी केलेल्या ब्लेसिंग मुजरबानीला केकेआरने घेतलं आहे. त्यानेही कराराला हिरवा कंदील दाखवला आणि पीएसएलमधून माघार घेतली. आता ही जखम भरून निघत नाही तोच आणखी एक फटका बसला आहे. केकेआरचा स्टार गोलंदाज हर्षित राणा आयपीएल 2026 स्पर्धेला मुकला आहे.
हर्षित राणा हा टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेचा भाग होता. त्याला सराव सामन्यात दुखापत झाली आणि स्पर्धेला मुकला. त्याच्या ऐवजी संघात मोहम्मद सिराजला संधी मिळाली. यानंतर हर्षित राणाच्या दुखापतीवर यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली. पण त्यातून पूर्णपणे सावरलेला नाही. त्यामुळे आयपीएल 2026 स्पर्धेतून माघार घेतली आहे. त्यामुळे आता हर्षित राणाची जागा भरून काढणं केकेआरसाठी डोकेदुखी ठरणार आहे. कारण हर्षित राणा हा केकेआरच्या गोलंदाजीचा महत्त्वाचा भाग होता. पावर प्लेमध्ये अचूक टप्प्याची गोलंदाजी करून विकेट घेण्यात तरबेज होता. त्यामुळे त्याची प्लेइंग 11 मध्ये जागा पक्की होती. पण जखमी असल्याने केकेआरला धक्का बसला आहे.
“राणावर शस्त्रक्रिया दिनशॉ पारडीवाला यांनी कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात केली. लॅटरल मेनिस्कसची शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. शस्त्रक्रिया आणि विश्रांतीनंतर तो पुनर्वसन सुरू करेल आणि बेंगळुरूमधील बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्सला अहवाल देईल,” असे सूत्रांनी टाइम्स इंडियाशी बोलताना सांगितले .
आयपीएल 2026 स्पर्धेसाठी हर्षित राणाला 4 कोटींची रक्कम ठरली होती. पण आता स्पर्धेला मुकला आहे. असं असलं तरी त्याला 4 कोटी रूपये मिळणार आहे. पण ही रक्कम हर्षित राणाला नाही तर बीसीसीआयला मिळेल. बीसीसीआयच्या नियमानुसार, सेंट्रल करारातील खेळाडूंना दुखापत झाली आणि पूर्ण स्पर्धेला मुकला तर त्याला पूर्ण पगार मिळणार आहे.