VIDEO भारताच्या पंतप्रधानांनी ठरवलं, तर पाकिस्तान क्रिकेट बोर्ड कोसळेल – रमीज राजा

भारताने हात खेचला, तर पाकिस्तान क्रिकेट बोर्ड कोसळून पडेल, असं रमीज राजा का म्हणाले?

VIDEO भारताच्या पंतप्रधानांनी ठरवलं, तर पाकिस्तान क्रिकेट बोर्ड कोसळेल -  रमीज राजा
pcb ramiz raja
Image Credit source: instagram
| Updated on: Oct 19, 2022 | 6:13 PM

मुंबई: भारत-पाकिस्तान (IND vs PAK) क्रिकेट संबंध पुन्हा एकदा बिघडले आहेत. जय शाह यांची काल बीसीसीआयच्या (BCCI) सचिवपदी फेरनिवड झाली. त्यानंतर यांनी टीम इंडिया आशिया कप 2023 (Asia Cup 2023) साठी पाकिस्तान दौऱ्यावर जाणार नाही, हे जाहीर केलं. त्यामुळे भारत-पाकिस्तान क्रिकेट संबंधात तणाव निर्माण झाला आहे.

हा बीसीसीआयचा स्टँड

आशिया कप 2023 स्पर्धा न्यूट्रल वेन्यू म्हणजे त्रयस्थ ठिकाणी आयोजित करावी, अशी भूमिका जय शाह यांनी जाहीर केली. हा बीसीसीआयचा स्टँड आहे. मुंबईत झालेल्या 91 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत हा निर्णय घेण्यात आला.

जय शाह काय म्हणाले?

“आशिया कप 2023 टुर्नामेंट त्रयस्थ ठिकाणी आयोजित करा, ACC चा अध्यक्ष या नात्याने मी हे सांगतोय. आम्ही पाकिस्तानात जाऊ शकत नाही. ते इथे येऊ शकत नाहीत. याआधी सुद्धा आशिया कप टुर्नामेंट न्यूट्रल वेन्यूवर खेळवण्यात आली आहे” असं जय शाह म्हणाले.

पाकिस्तानातून कठोर प्रतिक्रिया

बीसीसीआयच्या या भूमिकेनंतर पाकिस्तानातूनही कठोर प्रतिक्रिया आल्या आहेत. पुढच्यावर्षी भारतात आयसीसी पुरुष वर्ल्ड कप स्पर्धा होणार आहे. त्यात पाकिस्तानी टीमने सहभागी होऊ नये, असा सूर पाकिस्तानी क्रिकेट वर्तुळातून उमटतोय.

जुना व्हिडिओ व्हायरल

बुधवारी दुपारी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने अधिकृत स्टेटमेंट जारी केलं. त्यात पीसीबीने बीसीसीआयच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पीसीबी अध्यक्ष रमीज राजा यांचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

रमीज राजांनी या व्हिडिओमध्ये काय म्हटलय?

या व्हिडिओमध्ये रमीज राजा भारतीय क्रिकेटच जागतिक क्रिकेटवर किती प्रभाव आहे, त्याचं महत्त्व विषय करतायत. भारताच्या सपोर्ट्शिवाय पाकिस्तान क्रिकेट कोलमडून पडेल, असंही रमीज राजा यांनी त्या व्हिडिओमध्ये म्हटलं आहे.

आयसीसी फंडामध्ये 90 टक्के पैसा कुठून येतो?

“पाकिस्तान क्रिकेट बोर्ड 50 टक्के आयसीसीकडून मिळणाऱ्या पैशावर चालतं. आयसीसी क्रिकेट स्पर्धा आयोजित करते आणि त्यातून मिळणाऱ्या पैशाच सदस्य देशांमध्ये वाटप करते. आयसीसी फंडामध्ये 90 टक्के भारतीय बाजारपेठेतून पैसा येतो. त्यामुळे इंडियन बिझनेस हाऊसेस पाकिस्तानच क्रिकेट चालवतात. उद्या भारताच्या पंतप्रधानांनी ठरवलं, तर पाकिस्तानला मिळणारा पैसा ते रोखू शकतात. पीसीबी कोसळून जाईल” असं रमीज राजा या व्हिडिओमध्ये बोलताना दिसतात.

पाकिस्तान सातत्याने दहशतवादाला खतपाणी घालत असतो. पाक पुरस्कृत दहशतवादी हल्ले भारतात होतात. त्यामुळे दोन्ही देशांमध्ये संबंध खराब आहेत. मागच्या काही वर्षात दोन्ही देशांमध्ये एकही द्विपक्षीय क्रिकेट मालिका झालेली नाही. फक्त आयसीसी टुर्नामेंटमध्ये दोन्ही टीम्स परस्पराविरोधात खेळल्या आहेत.