
आशिया कप 2025 स्पर्धेसाठी भारतीय संघाची मंगळवारी 19 ऑगस्टला बीसीसीआय निवड समितीकडून घोषणा केली जाऊ शकते. भारतीय संघात कोणत्या 15 खेळाडूंना संधी मिळणार? हे थोड्या तासांतच स्पष्ट होण्याची शक्यता आहे. मात्र यंदा संघात स्थान मिळवण्यासाठी जोरदार चुरस आहे. शुबमन गिल आणि यशस्वी जैस्वाल या युवा आणि प्रमुख फलंदाजांचंही संघातील स्थान निश्चित नाही. यावरुन किती चुरस आहे, हे लक्षात येतं. तसेच या स्पर्धेत भारतासाठी सलामीला कोण येणार? जसप्रीत बुमराह खेळणार की नाही? बॅकअप विकेटकीपर म्हणून कुणाला संधी मिळणार? हे आणि असे अनेक प्रश्न क्रिकेट चाहत्यांना भेडसावत आहेत. या अशा चर्चांदरम्यान दिग्गज समालोचक हर्षा भोगले यांनी आशिया कप स्पर्धेसाठी त्यांचा संघ जाहीर केला आहे. भोगलेंनी त्यांच्या संघात कुणाला संधी दिलीय? हे जाणून घेऊयात.
हर्षा भोगले यांनी त्यांच्या 15 सदस्यीय संघात 6 फलंदाजांचा समावेश केला आहे. भोगलेंनी सूर्यकुमार यादव याला कर्णधारपदाची जबाबदारी दिली आहे. तसेच अभिषेक शर्मा आणि तिलक वर्मा या जोडीचा समावेश करण्यात आला आहे. भोगलेंनी संजू सॅमसन याला विकेटकीपर म्हणून पसंती दिली आहे. तर बॅकअप विकेटकीपर म्हणून जितेश शर्मा याला संधी दिली आहे. तसेच श्रेयस अय्यर याचीही निवड करण्यात आली आहे. भोगलेंनी यशस्वी जैस्वाल आणि शुबमन गिल या दोघांचा विचार केला नाही.
भोगलेंनी या 15 सदस्यीय संघात 4 अष्टपैलूंना संधी दिली. यामध्ये हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल आणि वॉशिंग्टन सुंदर यांचा समावेश आहे.
भोगलेंनी 3 वेगवान आणि 2 फिरकी गोलंदाजांना पसंती दिली आहे. वेगवान गोलंदाजांमध्ये जसप्रीत बुमराह, प्रसिध कृष्णा आणि अर्शदीप सिंह आहेत. तर कुलदीप यादव आणि वरुण चक्रवर्ती यांच्यावर फिरकी गोलंदाजाची जबाबदारी सोपवली आहे. त्यामुळे आता बीसीसीआयने भारतीय संघाची घोषणा केल्यानंतर हर्षा भोगले यांची संघ निवड किती अचूक ठरते? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
आशिया कप 2025 स्पर्धेसाठी हर्षा भोगले यांनी निवडलेला भारतीय संघ : सूर्यकुमार यादव, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन, जितेश शर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंह आणि प्रसिद्ध कृष्णा.