घाबरु नका, महाराष्ट्रातील जनतेच्या हक्काच्या रक्षणासाठी राज्य सरकार समर्थ : मुख्यमंत्री

घाबरु नका, महाराष्ट्रातील जनतेच्या हक्काच्या रक्षणासाठी राज्य सरकार समर्थ : मुख्यमंत्री

या कायद्यामुळे महाराष्ट्रातील जनतेने घाबरण्याची गरज नाही. महाराष्ट्रातील जनतेचे हक्क कुणीही हिरावून घेऊ शकत नाही, त्यांच्या हक्काच्या रक्षणासाठी राज्य सरकार समर्थ आहे

Nupur Chilkulwar

|

Dec 20, 2019 | 6:07 PM

नागपूर : देशात सध्या नागरिकत्व सुधारणा कायद्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे (CAA). मात्र, या कायद्यामुळे महाराष्ट्रातील जनतेने घाबरण्याची गरज नाही. महाराष्ट्रातील जनतेचे हक्क कुणीही हिरावून घेऊ शकत नाही, त्यांच्या हक्काच्या रक्षणासाठी राज्य सरकार समर्थ आहे, असं आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागपुरात दिलं (CM Uddhav Thackeray on CAA).

“मी महाराष्ट्राच्या जनतेला आवाहन करतोय, संसदेने नागरिकत्व कायदा मंजूर केला आहे. मात्र, या कायद्याबाबत देशात संभ्रम आहे. देशात अशांतता पसरली आहे, निदर्शने होत आहेत. देशभर हिंसाचार सुरु आहे. महाराष्ट्रातही सभा, मोर्चे होत आहेत. त्यामुळे मी राज्यातील जनतेला सांगू इच्छितो की तुम्ही कोणताही गैरसमज करुन घेऊ नका. महाराष्ट्रातील कोणत्याही समाजातील नागरिकाने याबाबत मनात भीती बाळगू नये, महाराष्ट्र सरकार सर्व नागरिकांच्या हिताचं रक्षण करण्यास समर्थ आहे”, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

“सर्वोच्च न्यायालयात हा कायदा योग्य की अयोग्य याबाबतचा निर्णय व्हायचा आहे. मी अनेकांशी बोलत आहे. मला भेटल्यानंतर अनेकांचे गैरसमज दूर होत आहेत. कोणत्याही समाजातील नागरिकाने भीती, गैरसमज बाळगू नये. महाराष्ट्रातील सलोखा कायम ठेवा. महाराष्ट्र देशाला एक नवी दिशा देत आहे, यामध्ये जो कोणी विष कालवण्याचं काम करत आहेत, त्याला बळी पडू नका”, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं.

CAA विरोधात देश पेटला

केंद्र सरकारने नागरिकत्व कायदा पारित केला. त्यानंतर देशात संतापाची लाट उसळली. हा कायदा संविधानविरोधी असल्याचा आरोप विरोधीपक्षांनी केला. CAA विरोधात देशात अनेक ठिकाणी ही आंदोलनं सुरु आहेत. नागरिक रस्त्यावर उतरत आहेत. या कायद्याविरोधात कुठे शांततेत निदर्शनं झाली, तर कुठे हिंसाचारही पाहायला मिळाला. CAA विरोधाचे पडसाद महाराष्ट्रातही पाहायला मिळाले. पुणे, मुंबई, नागपूर, औरंगाबाद, मालेगावातही मोठ्या प्रमाणात आंदोलनं करण्यात आली. पुण्यात विद्यार्थ्यांनी या कायद्याच्या निषेधार्थ निदर्शनं केली, तर मुंबईच्या आझाद क्रांती मैदानावर बॉलिवूड कलाकार, विद्यार्थी आणि इतर श्रेत्रातील लोकांनी एकत्र येत या कायद्याचा निषेध केला.

CAA Protest In Maharashtra

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें