‘शिवसेनेच्या नेत्यांनीही यापूर्वी अशी वक्तव्य केली, त्यांच्यावर कुठे गुन्हे दाखल केले?’ रामदास आठवलेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल

राणेंच्या अटकेच्या कारवाईवरुन भाजप नेते आणि मित्रपक्षाचे नेतेही आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. नारायण राणे यांची जी भाषा आहे ती शिवसेनेचीच भाषा आहे. त्यामुळे त्यांना उत्तर देताना शिवसेनेच्या भाषेतूनच उत्तर द्यायचं होतं. पण तसं न करता चुकीच्या पद्धतीनं कारवाई केल्याचा आरोप केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी केलाय.

'शिवसेनेच्या नेत्यांनीही यापूर्वी अशी वक्तव्य केली, त्यांच्यावर कुठे गुन्हे दाखल केले?' रामदास आठवलेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल
केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, केंद्रीय मंत्री नारायण राणे


नागपूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आक्षेपार्ह वक्तव्यं केल्यानंतर आज रत्नागिरी पोलिसांकडून राणेंना अटक करण्यात आली आहे. त्यानंतर त्यांना महाड पोलीस ठाण्याकडे घेऊन जाण्यात आलंय. दरम्यान, राणेंच्या अटकेच्या कारवाईवरुन भाजप नेते आणि मित्रपक्षाचे नेतेही आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. नारायण राणे यांची जी भाषा आहे ती शिवसेनेचीच भाषा आहे. त्यामुळे त्यांना उत्तर देताना शिवसेनेच्या भाषेतूनच उत्तर द्यायचं होतं. पण तसं न करता चुकीच्या पद्धतीनं कारवाई केल्याचा आरोप केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी केलाय. (Ramdas Athavale on action taken against Union Minister Narayan Rane)

यापूर्वी अनेक शिवसेना नेत्यांनी आणि शिवसैनिकांनी असं व्यक्तव्य केलं आहे. त्यांच्यावर कुठे गुन्हे दाखल झाले, पोलिसांनी पकडलं दाखवा, असं आव्हानच रामदास आठवले यांनी महाविकास आघाडी सरकारला दिलंय. त्याचबरोबर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना भाषणातून उत्तर द्यायला हवं होतं. पण पोलिसांकडून कारवाई करुन घेतली ती चुकीची आहे. पोलिसांची यात चूक नाही. पोलिसांच्या माध्यमातून सरकारकडून ही कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई चुकीची आहे, त्यांनी काही गुन्हा केलेला नाही, अशा शब्दात रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केलीय.

राणेंच्या जीवाला धोका, प्रसाद लाड यांचा गंभीर आरोप

राणे यांना ताटकळत ठेवून कोर्टात हजर करायचं नाही आणि त्यांचा छळ करण्याचा प्रयत्न सुरु आहे. राणे यांच्या जीवाला धोका आहे. आता एका मंत्र्याचा व्हिडीओ समोर आलाय. तो मंत्री फोनवरुन पोलीस अधीक्षकांना फोन करुन दबाव टाकताना दिसत आहे, असा आरोपही लाड यांनी केलाय. पोलिस राणेंसोबत ज्या पद्धतीने वागले त्याचा व्हिडीओ माझ्याकडे आहे. आमदार, खासदार, मंत्री बाजूला ठेवा. पण एका ज्येष्ठ नागरिकांला अशी वागणूक दिली जात आहे, जी चुकीची आहे. राणे यांची अद्याप अटक दाखवण्यात आलेली नाही. त्यांना ताटकळत ठेवण्याचा प्रयत्न सुरु आहे. माझा स्पष्ट आरोप आहे की राणेंच्या जीवाला धोका आहे, असा गंभीर आरोप लाड यांनी केलाय.

काय आहे प्रकरण?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर पातळी सोडून टीका केल्याचे प्रकरण आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना भोवण्याची शक्यता आहे. कारण, नारायण राणे यांच्यावर पोलिसांकडून गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांना अटक करण्यात येणार आहे. शिवसेना नेते सुधाकर बडगुजर यांनी नाशिक पोलिसांकडे यासंदर्भात तक्रार केली होती. नाशिक पोलिसांच्या सायबर सेलने नारायण राणे यांच्यावर गुन्हा दाखल केला होता.

नारायण राणे नेमकं काय म्हणाले होते?

नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा सध्या कोकणात आहे. रायगडच्या महाडमध्ये पत्रकारांशी बोलताना राणे यांनी मुख्यमंत्र्यांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्ष असल्याचं विसरले. त्यावेळी त्यांनी हीरक महोत्सव हा शब्द वापरला. मात्र, तिथे उपस्थित असलेले राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी मुख्यमंत्र्यांना अमृत महोत्सव असल्याचं सांगितलं. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आपली चूक सुधारली. “आज 74 वर्षे पूर्ण करुन 75 व्या वर्षात अमृत महोत्सवी… नाही हीरक महोत्सवी… अमृत महोत्सवी वर्षात आपण पदार्पण करतो आहोत”, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. त्यावरुन राणे यांनी मी तिथे असतो तर कानाखाली लगावली असती, असा शब्दांत नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर प्रहार केला होता.

संबंधित बातम्या :

राणेंचा बीपी वाढला, डॉक्टर म्हणतात, हॉस्पिटलमध्ये दाखल करणं गरजेचं

नारायण राणे यांचा आजचा मुक्काम पोलीस ठाण्यात की रुग्णालयात? वाचा सविस्तर घडामोड

Ramdas Athavale on action taken against Union Minister Narayan Rane

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI