मोठी बातमी ! महायुतीचं अभूतपूर्व यश… ठाण्यापासून चंद्रपूरपर्यंत 6 ठिकाणी बिनविरोध… आघाडीला मोठा धक्का
आज विधान परिषद निवडणुकीचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. महायुतीमध्ये या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाली होती, मात्र ही बंडखोरी मोडून काढण्यात महायुतीला यश आलं आहे.

राज्यात सध्या विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीमध्ये महायुतीमध्ये मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाल्याचं पहायला मिळालं होतं. उमेदवारीसाठी इच्छूक असलेल्या परंतु तिकीट न मिळालेल्या अनेक नेत्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. ही बंडखोरी महायुतीसाठी डोकेदुखीचा विषय ठरू शकते असा अंदाज व्यक्त केला जात होता. परंतु अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी ही बंडखोरी रोखण्यात महायुतीला मोठं यश आलं आहे. 17 जागांपैकी महायुतीने 6 जागा या बिनविरोध केल्या आहेत. यामध्ये ठाणे, कोकण, यवतमाळ, वर्धा- गडचिरोली- चंद्रपूर, पुणे आणि अहिल्यानगर या 6 जांगाचा समावेश आहे.
धाराशिवमध्ये बंडखोरी रोखण्यात यश
तुळजापुरचे भाजपचे नगराध्यक्ष विनोद गंगणे यांच्या पत्नी अर्चना गंगणे यांनी अखेर आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. धाराशिव, लातूर, बीड विधान परिषद निवडणुकीसाठी बंडखोरी करत अर्चना गंगणे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता, अखेर त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने महायुतीला मोठा दिलासा मिळाला आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी आज त्यांनी आपला अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे आता या मतदारसंघात भाजपकडून बसवराज पाटील तर काँग्रेसकडून महेश देशमुख यांच्यामध्ये लढत होणार आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दोन अपक्ष उमेदवार अजूनही रिंगणात आहेत.
नांदेडमध्ये काय स्थिती?
नांदेड विधान परिषद निवडणुकीमध्ये देखील बंड रोखण्यात महायुतीला यश आलं आहे. राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांचे पुत्र प्रवीण पाटील चिखलीकर यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. वरिष्ठ नेत्यांच्या आदेशानुसार उमेदवारी अर्ज मागे घेतल्याचं त्यांनी सांगितलं. नांदेडमध्ये महायुतीकडून भाजपच्या अमरनाथ राजूरकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. संयुक्त पत्रकार परिषदेत खासदार अशोक चव्हाण आणि आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी प्रवीण पाटील चिखलीकर माघार घेणार असल्याची घोषणा केली होती, त्यानुसार आता प्रवीण पाटील चिखलीकर यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे.
नाशिकमध्ये अजूनही टेन्शन कायम
नाशिकमधून मोठी बातमी समोर आली आहे, नाशिक विधान परिषदेची जागा ही महायुतीमध्ये शिवसेना शिंदे गटाला मिळाली आहे. मात्र दुसरीकडे या विधान परिषदेसाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून विष्णुपंत म्हैसधुने आणि गोरख बोडके यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. तर दुसरीकडे याच मतदारसंघातून गणेश गीते यांनी भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल केला होता, तर त्यांचे बंधू गोकूळ गीते यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. दरम्यान गणेश गीते हे आपला उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी तयार झाले आहेत, मात्र गोकूळ गीते हे अजूनही नाराज असल्यानं नाशिकमध्ये महायुतीचं टेन्शन वाढलं आहे.
परभणी- हिंगोली विधान परिषद
परभणी- हिंगोली विधान परिषदेमधील महायुतीतील राष्ट्रवादीच्या दोन उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत. राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या शिष्टाईला यश आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे संग्राम जामकर आणि विजय जामकर यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. राष्ट्रवादीचे आमदार राजेश विटेकर आणि मित्र पक्षाचे आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या उपस्थितीत दोघांनीही उमेदवारी अर्ज मागे घेतले.
यवतमाळमध्येही बंडखोरांची माघार
यवतमाळ विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे बंडखोर उमेदवार साजिद बेग यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे, तसेच आपण आता महायुतीच्या उमेदवारासोबत आहोत, असं देखील त्यांनी जाहीर केलं आहे. तर दुसरीकडे भाजपचे बंडखोर उमेदवार नितीन भुतडा यांनी देखील या निवडणुकीतून माघार घेतली आहे.
सांगली-सातारा विधान परिषद
सांगली-सातारा विधान परिषद निवडणुकीतून शिवसेच्या उमेदवाराने आपला अर्ज मागे घेतला आहे. मंत्री शंभूराजे देसाई यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर तानाजी पाटील यांनी आपला अर्ज मागे घेतला आहे, त्यामुळे आता या विधान परिषद मतदारसंघातील बंडखोरी रोखण्यात महायुतीला यश आलं आहे.
नागपूर विधान परिषद निवडणूक
नागपूर विधान परिषदेत काँग्रेसकडून अर्ज दाखल केलेल्या दिनेश ढोले यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. काँग्रेसकडून खबरदारीचा म्हणून अतुल लोंढे यांच्यासोबत दिनेश ढोले यांनी डमी उमेदवारी अर्ज दाखल केला होता, त्यांनी या निवडणुकीतून माघार घेतली आहे. दिनेश ढोले यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याने आता अतुल लोंढे हे काँग्रेसचे अधिकृत उमेदवार असणार आहेत, त्यामुळे आता इथे भाजप आणि काँग्रेसमध्ये थेट लढत होणार असून, इथे भाजपकडून डॉ. राजीव पोतदार यांना उमेदवारी देण्यात आली आहे.