एसी कोचमध्ये बसले, प्रवासात डुलकी लागली अन् पुढच्या सेकंदात… मुंबईतील व्यापारासोबत एक्सप्रेसमध्ये काय घडले?
सोलापूर-कल्याण प्रवासादरम्यान सिद्धेश्वर एक्सप्रेसच्या एसी कोचमधून व्यापाऱ्याचे ₹5.5 कोटींचे सोने चोरीला गेले. अभयकुमार जैन या व्यावसायिकाच्या बॅगेतील दागिने प्रवासात लंपास झाले. कल्याण रेल्वे पोलिसांनी तातडीने गुन्हा नोंदवून तीन तपास पथके नेमली आहेत.

सोलापूर-कल्याण प्रवासादरम्यान सिद्धेश्वर एक्सप्रेसच्या एसी कोचमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. सिद्धेश्वर एक्सप्रेसमधून प्रवास करणाऱ्या एका व्यापाऱ्याचे साडे पाच कोटींचे सोने असलेली बॅग चोरीला गेल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. सोलापूरमधील एका मोठ्या सोन्या-चांदीच्या पेढीचे मालक आणि गोरेगाव येथील रहिवासी असलेले व्यापारी अभयकुमार जैन हे या घटनेचे बळी ठरले आहेत. याप्रकरणी कल्याण रेल्वे पोलिसांनी या प्रकरणी तपास वेगाने सुरू केला आहे. या चोरीमागे रेल्वेत सक्रीय असलेल्या संघटित टोळीचा हात असल्याची शक्यता बळावली आहे.
नेमकं काय घडलं?
व्यापारी अभयकुमार जैन (६०) हे ६ डिसेंबर रोजी आपल्या व्यवसायाच्या कामासाठी सोलापूर येथे गेले होते. काम आटोपल्यावर ते परत मुंबईला येण्यासाठी सिद्धेश्वर एक्स्प्रेसच्या एसी कोचमधून प्रवास करत होते. जैन यांनी सुमारे साडे पाच कोटी रुपये किंमतीचे सोन्याचे आणि हिऱ्याचे दागिने एका मोठ्या बॅगेत सुरक्षित ठेवले होते. ही बॅग त्यांनी सीटखाली लॉक करून ठेवली होती. प्रवास करत असताना त्यांना झोप लागली. पहाटे जाग आल्यानंतर जैन यांनी आपली बॅग जागेवर आहे की नाही हे तपासले. मात्र त्यांना बॅग जागेवरून गायब झाल्याचे दिसले. बॅग लंपास झाल्याचे कळताच अभयकुमार जैन यांना मोठा धक्का बसला.
जैन यांनी तातडीने रेल्वेचे कर्मचारी आणि तिकीट तपासनीस यांना माहिती दिली. ट्रेन कल्याण स्टेशनवर थांबल्यावर त्यांनी कल्याण रेल्वे लोहमार्ग पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. कल्याण रेल्वे पोलिसांनी जैन यांच्या तक्रारीवरून तातडीने चोरीचा गुन्हा नोंदवला आहे. चोरी झालेल्या दागिन्यांची मोठी किंमत पाहता, या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पोलिसांनी प्राधान्य दिले आहे. या गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी तीन विशेष तपास पथके तातडीने तयार करण्यात आली आहेत. ही पथके सोलापूर, पुणे, दौंड आणि कल्याण या प्रमुख स्टेशनवरील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत.
हाय-प्रोफाइल चोरट्यांच्या टोळीचे काम
तसेच जैन हे ज्या डब्यातून प्रवास करत होते, त्या डब्यामध्ये संशयास्पदरित्या कोणी चढले किंवा उतरले याचा मागोवा घेतला जात आहे. सोन्याची किंमत आणि चोरीची पद्धत पाहता, हे काम साध्या चोरट्यांचे नसून, हाय-प्रोफाइल चोरट्यांच्या टोळीचे असू शकते, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. सध्या रेल्वे स्टेशन आणि परिसरात असलेल्या माहितीदारांकडून गुप्त माहिती गोळा केली जात आहे. प्रवासादरम्यान डब्यात ड्यूटीवर असलेल्या रेल्वे कर्मचारी, आरपीएफ जवान आणि टीटीई यांचीही चौकशी सुरू आहे.
