‘मेलेल्या एक्स बॉयफ्रेंडच्या नावाचा वापर करणारी मला शिकवतेय..’; अंकिता लोखंडेवर अभिनेत्रीची टीका
हिना खानच्या कॅन्सरवरून टीका करणाऱ्या एका अभिनेत्रीला अंकिता लोखंडेनं फटकारलं होतं. आता त्याच अभिनेत्रीने अंकितावर निशाणा साधला आहे. अंकिताने बिग बॉसमध्ये सुशांत सिंह राजपूतच्या नावाचा वापर केल्याच आरोप तिने केल आहे.

ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज देणाऱ्या अभिनेत्री हिना खानवर काही दिवसांपूर्वी अभिनेत्री रोजलीन खानने बरीच टीका केली होती. प्रसिद्धीसाठी हिना हे सर्व नाटक करतेय, असं तिने म्हटलं होतं. “ती तिसऱ्या स्टेजच्या कॅन्सरवरील उपचाराविषयी दोन ओळी तरी सांगू शकते का? की तिने फक्त प्रकाशझोतात राहण्यासाठी कॅन्सरचा उपयोग केलाय? गैरसमज पसरवण्यासाठी केलेली ही अत्यंत दयनीय आणि लज्जास्पद कृती आहे,” अशी टीका रोजलीनने हिनावर केली होती. त्यानंतर अभिनेत्री अंकिता लोखंडेनं हिनाची बाजू घेत रोजलीनला फटकारलं होतं. अशातच रोजलिननेही अंकिताला प्रत्युत्तर दिलं आहे. बिग बॉसच्या घरात अंकिताने सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूचा फायदा उचलल्याचा आरोप रोजलीनने केला आहे.
रोजलीन खानने अंकिताचं नाव न घेता सोशल मीडियावर भलीमोठी पोस्ट लिहिली आहे. त्यात तिने म्हटलंय, ‘एक बाई जी तिच्या एक्स बॉयफ्रेंडच्या मृत्यूचा वापर बिग बॉससाठी करू शकते, ती मला खालच्या पातळीबद्दल ज्ञान शिकवतेय. यात फार काही आश्चर्य नाही. स्वस्तातली प्रसिद्धी घेण्यासाठी ती हे सर्व करतेय. बहीण, किमोची स्पेलिंग तर योग्य लिहून दाखव. कोण बोलतंय बघा. अशा महिलेला मी उत्तर दिलं पाहिजे का? माझ्या पायांशी बोल. ती बिळात उंदरासारखी लपली आहे आणि कुत्रे भुंकतायत.’ रोजलीनची ही पोस्ट अंकितासाठी असल्याचं सहज स्पष्ट होतंय. कारण हिना खानवर टीका केल्याने अंकितानेच रोजलीनला फटकारलं होतं. त्याचप्रमाणे ‘बिग बॉस 17’मध्ये अंकिताने अनेकदा तिचा एक्स बॉयफ्रेंड आणि दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा उल्लेख केला होता.




View this post on Instagram
‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री हिना खान सध्या कॅन्सरशी झुंज देत आहे. हिनावर ब्रेस्ट कॅन्सरचे उपचार सुरू आहेत. कॅन्सरवरील उपचार अत्यंत कठीण असून त्यातील किमोथेरेपीदरम्यान सर्व केस गळतात. या परिस्थितीलाही ती धैर्याने सामोरी जातेय. हिना सोशल मीडियाद्वारे सतत तिच्या उपचाराबद्दलची माहिती देत आहे. अनेकजण तिच्या धैर्याचं कौतुक करत आहेत. मात्र रोजलीनने तिच्यावर याच कारणासाठी टीका केली. हा सगळा पीआर स्टंट असून प्रसिद्धीसाठी ती सर्वकाही वाढवून-चढवून सांगत असल्याची टीका रोजलीन खानने केली होती.