हा फक्त ट्रेलर होता, संपूर्ण पिक्चर… संरक्षण मंत्र्याचा इशारा काय?; आयएमएफला काय आवाहन?

देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पुन्हा एकदा पाकिस्तानला दम भरला आहे. पाकिस्तानला सध्या आम्ही चांगल्या वर्तनाच्या प्रोबेशनवर ठेवलं आहे. त्यांच्या वर्तनात सुधारणा झाली तर चांगलंच आहे. पण नाही झाली तर पाकिस्तानला अद्दल घडवली जाईल. यापेक्षाही कठोर शिक्षा दिली जाईल, असा गंभीर इशाराच राजनाथ सिंह यांनी दिला आहे.

हा फक्त ट्रेलर होता, संपूर्ण पिक्चर... संरक्षण मंत्र्याचा इशारा काय?; आयएमएफला काय आवाहन?
Rajnath Singh
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: May 16, 2025 | 12:58 PM

ऑपरेशन सिंदूर हा एक ट्रेलर होता. योग्यवेळ आली तर संपूर्ण पिक्चर दाखवला जाईल, असा इशारा देतानाच आता सध्या आम्ही पाकिस्तानला प्रोबेशनवर ठेवलं आहे, असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले. तसेच पाकिस्तानने दहशतवाद्यांना आर्थिक सहाय्य करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे आयएमएफने पाकिस्तानला दिलेल्या आर्थिक मदतीवर पुनर्विचार करावा, असं आवाहनही राजनाथ सिंह यांनी केली आहे. राजनाथ सिंह हे गुजरातच्या भूज एअरबेसवर आले होते. यावेळी त्यांनी जवानांना संबोधित करताना पाकिस्तानला गंभीर इशारा दिला आहे.

नवीन भारत सहन करत नाही, तर तो प्रत्युत्तर देतो, हे तुम्ही दाखवून दिलं आहे. तुम्ही देशाचे आयडॉल आहात. पंतप्रधानांच्या नेतृत्वात नवा भारत निर्माण झाला आहे. ऑपरेशन सिंदूर संपलेलं नाही. आता फक्त ट्रेलर होता. जेव्हा योग्यवेळ येईल तेव्हा आम्ही पूर्ण पिक्चर दाखवू, असा इशारा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दिला आहे.

एखादा उपद्रवी भविष्यात काही उपद्रव करण्याची शक्यता असते तेव्हा त्याला मॅजिस्ट्रेट गुड बिहेव्हियरच्या प्रोबेशनवर ठेवतात. जर ती व्यक्ती या काळात काही गुन्हा करत असेल तर त्याला शिक्षा सुनावली जाते. त्याच प्रकारे आम्ही पाकिस्तानला सध्याच्या स्थितीत सीजफायरमध्ये बिहेव्हियरच्या आधारे प्रोबेशनवर ठेवलं आहे. जर त्यांचं बिहेव्हियर सुधारलं तर ठिक. जर त्यांच्या बिहेव्हियरमध्ये गडबड झाली तर त्यांना कठोरातील कठोर शिक्षा सुनावली जाईल. आता भारताने पाकिस्तानला प्रोबेशनवर ठेवलंय, असं राजनाथ सिंह म्हणाले.

आयएमएफने पुनर्विचार करावा

भारताने हल्ल्या दरम्यान 15 ब्रह्मोस डागले. पाकिस्तानातील टेरर इन्फ्रास्ट्रक्चरच्या विरोधात आपण कारवाई केली आहे. पण पाकिस्तान सरकार पुन्हा एकदा हे इन्फ्रास्ट्रक्चर उभारण्याच्या कामाला लागला आहे. जैश ए मोहम्मद आणि लष्कर ए तोयबाला फंड देण्याचा निर्णय पाकने घेतला आहे. मसूद अजहरला 14 कोटी देणार आहे. आयएमएफकडून आलेला हा पैसा ते अतिरेक्यांसाठी वापरला जात आहे. पाकिस्तानला कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत देणे हा टेरर फंडसारखाच आहे. आयएमएफने पाकिस्तानला आर्थिक मदत देण्याचा पुनर्विचार करावा आणि पुन्हा भविष्यात निधी देण्यापूर्वी विचार करावा, असं आवाहन करतानाच पाकिस्तानात दहशतवाद आणि सरकार एकत्रच चालत आहेत. त्यांचा बुरखा फाडला गेला आहे, असं त्यांनी सांगितलं.

रात्रीच उजेड दाखवला

संपूर्ण जगाने पाहिलं तुम्ही पाकिस्तानच्या धरतीवरील दहशतवाद्यांच्या 9 ठिकाण्यांना नेस्तनाबूत केलं. तसेच त्यांच्या एअरबेसलाही हादरवलं. भारताची युद्धनीती आणि तंत्रज्ञान दोन्ही बदललं आहे. मोदींच्या नेतृत्वात जगाला नव्या भारताचा संदेश जगाला पोहोचवला आहे. भारत आता फक्त विदेशातील हत्यारांवर अवलंबून नाहीये. तर भारत आता देशात बनलेली हत्यारे वापर असून हे शस्त्र आमच्या सैन्य शक्तीचा भाग बनले आहेत. भारतात बनलेले हत्यारही अचूक आणि अभेद्य आहे. ब्रह्मोस मिसाईलच्या ताकदीला तर पाकिस्तानने स्वीकारलं आहे. दिन में तारे दिखना ही म्हण सर्वांना माहीत आहे. पण पाकिस्तानला रात्रीच्या अंधारातच ब्रह्मोसने उजेड दाखवला आहे. भारताच्या ज्या एअर डिफेन्सचं कौतुक होत आहे, त्यातील अन्य रडार सिस्टिमसह आकाशची भूमिका जबरदस्त राहिली, असं ते म्हणाले.