
आयपीएल 2025 अर्थात 18व्या पर्वाच्या साखळी फेरीच्या सामने आता अंतिम टप्प्यात आहेत. बहुतेक संघांनी 10 सामने खेळले आहेत. त्यामुळे आता फक्त काही सामने शिल्लक आहेत. चेन्नई सुपर किंग्स वगळता इतर सर्व संघ प्लेऑफच्या शर्यतीत आहेत. प्लेऑफच्या शर्यतीत असलेल्या संघांपैकी कोणते संघ पुढील फेरीत पोहोचतील? याची उत्सुकता आहे. असं असताना माजी क्रिकेटपटू अंबाती रायुडूने अंदाज वर्तवला आहे.

गुजरात टायटन्स: अंबाती रायुडूच्या मते, गुजरात टायटन्स यावेळी प्लेऑफमध्ये प्रवेश करेल हे निश्चित आहे. रायुडूने सांगितलं की, शुबमन गिलच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्स संघाने खेळलेल्या 9 पैकी सहा सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. पुढील पाच पैकी दोन सामने जिंकून प्लेऑफमध्ये पोहोचेल.

पंजाब किंग्स: श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील पंजाब किंग्स संघ देखील प्लेऑफमध्ये प्रवेश करेल. अंबाती रायुडूने सांगितलं की, पंजाब किंग्ज संघाने 10 सामने खेळत 13 गुण मिळवले आहेत. त्यामुळे उर्वरित चार पैकी दोन सामने जिंकणं शक्य आहे. पंजाब किंग्स प्लेऑफमध्ये जागा मिळवेल.

मुंबई इंडियन्स: हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्स संघाने सुरुवातीच्या अपयशानंतरही जबरदस्त कमबॅक केलं आहे. सलग पाच सामने जिंकले आहेत. रायुडू म्हणाला की, मुंबई इंडियन्सने आता 10 सामन्यांतून 12 गुण मिळवले आहेत. चार पैकी दोन विजय मिळवताच प्लेऑफमधील स्थान पक्क होईल.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू: रजत पाटिदारच्या नेतृत्वात आरसीबी संघ यावर्षी शानदार कामगिरी करत आहे. रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरूने 10 सामन्यांपैकी सातविजयांसह आधीच पॉइंट टेबलमध्ये अव्वल स्थान पटकावलं आहे. अंबाती रायुडू म्हणाला की, आरसीबी या वर्षीच्या प्लेऑफमध्ये नक्कीच दिसेल.