दोन महिन्यात दुसर्‍यांदा होम-कार लोन स्वस्त; EMI वर किती होईल बचत?

Home Car Loan EMI : यापूर्वी RBI ने फेब्रुवारी महिन्यात रेपो दर 0.25% कमी केला होता. तो 6.25% वर आला होता. मे 2020 नंतरची ही सर्वात मोठी कपात होती. 56 महिन्यानंतर ईएमआयमध्ये कपातीचा मार्ग मोकळा झाला होता. या दोन महिन्यात दुसऱ्यांदा होम-कार लोन स्वस्त झाले.

दोन महिन्यात दुसर्‍यांदा होम-कार लोन स्वस्त; EMI वर किती होईल बचत?
गृहकर्ज, वाहन कर्ज स्वस्त होणार
Image Credit source: गुगल
| Updated on: Apr 09, 2025 | 11:44 AM

भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) सलग दुसर्‍यांदा रेपो दरात 25 आधार अंकांची कपात केली आहे. त्यामुळे रेपो दर कमी होऊन 6% वर पोहचला आहे. या कपातीमुळे वाहन आणि गृह कर्जावरील ईएमआय घटला आहे. आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी बुधवारी चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या द्विमासिक पतधोरण समितीच्या बैठकीनंतर रेपो दरांची घोषणा केली. सोमवारी त्यांच्या अध्यक्षतेखाली पतधोरण समितीची बैठक सुरू होती. यापूर्वी फेब्रुवारी महिन्यात रेपो दरात 0.25 टक्क्यांच्या कपातीसह हा दर 6.25 टक्क्यांवर आला होता. मे, 2020 नंतर पहिल्यांदा अडीच वर्षानंतर पहिला बदल दिसला. या कपातीमुळे आता वाहन कर्ज आणि गृहकर्जावरील व्याजदरात कपात दिसून येईल.

गृहकर्जावरील हप्ता किती कमी होणार?

समजा 50 लाखांचे गृहकर्ज तुम्ही घेतले आहे. हे कर्ज 20 वर्षांच्या कालावधीसाठी आहे. त्यावर सध्या 8.25 टक्के व्याज दराने ईएमआय जमा होत असेल आणि आता नवीन रेपो दरातील बदलामुळे त्यावर केवळ 8 टक्के व्याजदर लागू होईल. त्याचा परिणाम ग्राहकांच्या कर्जावरील हप्त्यावर दिसून येईल. सध्या ग्राहकांना 8.25 टक्के दराने 42,603 रुपये ईएमआय येतो. तर रेपो दरात कपात झाल्याने हा हप्ता 41,822 रूपये असेल.

तर ज्यांचे 20 वर्षांकरीता 40 लाख रुपये गृहकर्ज आहे. त्यांना सुद्धा या रेपो दर बदलाचा फायदा होईल. सध्या त्यांना 8.25 टक्के व्याज दराने ईएमआय जमा करावा लागतो. रेपो दरात कपात झाल्याने व्याजदर 8 टक्क्यांवर येईल. ग्राहकांना जुन्या व्याजदराप्रमाणे 34,083 रुपयांचा हप्ता येत होता. आता नवीन व्याज दराने त्यांना 33,458 रुपयांचा कर्ज हप्ता जमा करावा लागेल.

महागाई झाली कमी

आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी पतधोरण सादर केले. त्यांनी या काळात महागाई कमी झाल्यावर समाधान व्यक्त केले. पतधोरण समितीच्या सर्व सदस्यांनी महागाई लक्षित प्रमाणापेक्षा कमी असल्याचे म्हटले आहे. त्याआधारेच रेपो दरात कपातीचा निर्णय घेण्यात आला. जर गरज असेल आणि वातावरण अनुकूल असेल तर येत्या काळात रेपो दरात अजून कपात होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने 56 महिने त्यांचे रेपो दराविषयीचे धोरण एकतर वाढीव आणि नंतर जैसे थे ठरवले होते. या फेब्रुवारी महिन्यापासून कपातीचे धोरण राबवण्यात आले आहे. सलग दुसर्‍यांदा रेपो दरात कपात करण्यात आली.

तर आरबीआय गव्हर्नर यांनी सध्या भडकलेल्या टॅरिफ वॉरवर चिंता व्यक्त केली. सध्याची परिस्थिती जगासाठी योग्य नसल्याचे ते म्हणाले. जागतिक विपरीत घडामोडी घडत असल्या तरी भारतीय अर्थव्यवस्थेवर त्यांनी विश्वास वर्तवला. या परिस्थिती सुद्धा भारतीय अर्थव्यवस्थेची घौडदौड सुरूच असेल असे ते म्हणाले.