सख्या भाऊ, बहिणीचा पाण्यात बुडून मृत्यू, नेमका कसा झाला अपघात

PUNE CRIME NEWS : पुणे जिल्ह्यात सख्या भाऊ-बहिणीचा मृत्यू झाला आहे. पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाल्यामुळे काळे कुटुंबावर शोककळा पसरली आहे. या घटनेची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

सख्या भाऊ, बहिणीचा पाण्यात बुडून मृत्यू, नेमका कसा झाला अपघात
| Updated on: Aug 05, 2023 | 8:43 AM

सुनिल थिगळे, पुणे | 5 ऑगस्ट 2023 : पुणे जिल्ह्यात काळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या कुटुंबातील दोन किशोरवयीन मुलांचा मृत्यू झाला आहे. पाण्यात बुडून दोघांचा मृत्यू झाला आहे. हे दोघे सख्ये भाऊ, बहिण आहेत. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील गंगापूर गाडेकरवाडी येथे ही घटना घडली आहे. या प्रकरणाची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

नेमका कसा झाला अपघात

दिगु अरूण काळे (वय 11) व अंजली अरूण काळे (वय 14) हे दोघे खेकडे पकडण्यासाठी गेले होते. हे दोघे वरसुबाई देवस्थान गाडेकरवाडी या ठिकाणी असलेल्या ओढयावर खेकडे पकडण्यासाठी जात असल्याचे घरी सांगितले. परंतु बराच वेळ झाल्यानंतर ते घरी परत आले नाही. त्यामुळे कुटुंबियांनी त्यांचा शोध सुरु केला. यावेळी ओढ्याजवळ त्यांचा मृतदेह सापडला. दोघे खेकडे पकडताना पाण्यात पडले अन् त्यांचा मृत्यू झाल्याचे यावेळी स्पष्ट झाले.

पाचवी अन् आठवीत होते

घटनेची माहिती मिळाल्यानंतर ग्रामस्थांनी ओढ्याजवळ धाव घेतली. दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. यावेळी दोन्ही मुलांचा श्वास बंद झालेला ग्रामस्थांना दिसले. त्यांना तातडीने रुग्णवाहिकेतून ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. परंतु त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी कुटुंबियांना सांगितले.

दिगु काळे हा पाचवीत तर अंजली काळे ही आठवीत शिकत होती. घटनेची माहिती नागरिकांनी घोडेगाव पोलिसांना दिली. त्यानंतर अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा तपास सहायक पोलीस निरीक्षक किरण भालेकर आणि सहकारी करीत आहेत. दोन्ही मुलांचा मृत्यू झाल्यामुळे काळे कुटुंबावर शोककळा पसरली आहे.