धोका वाढला! राज्यात कोरोनाचे 8 हजार 623 नवे रुग्ण सापडले

तर 24 तासांत 51 जणांचा मृत्यू झालाय. आतापर्यंत एकूण कोरोनाबाधित रुग्ण 21 लाख 46 हजार 777 वर पोहोचले आहेत.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 21:51 PM, 27 Feb 2021
धोका वाढला! राज्यात कोरोनाचे 8 हजार 623 नवे रुग्ण सापडले
corona virus news

मुंबईः गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे राज्य सरकारही सतर्क झालेय. मागील 24 तासांत राज्यात कोरोनाचे 8 हजार 623 नवे रुग्ण सापडल्यानं चिंता वाढलीय. गेल्या 24 तासांत 3 हजार 648 जणांना डिस्चार्ज देण्यात आलाय, तर 24 तासांत 51 जणांचा मृत्यू झालाय. आतापर्यंत एकूण कोरोनाबाधित रुग्ण 21 लाख 46 हजार 777 वर पोहोचले आहेत. (8 Thousand 623 New Patients Of Corona Were Found In The State)

कोरोनामुळे आतापर्यंत 52 हजार 92 जणांचा मृत्यू

कोरोनामुळे 52 हजार 92 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळालीय. आतापर्यंत 20 लाख 20 हजार 951 जणांना डिस्चार्ज देण्यात आलाय. तर मुंबईत आज 987 जणांना कोरोनाची लागण झालीय. आज दिवसभरात मुंबईत कोरोनानं 4 जणांचा मृत्यू झालाय.

या शहरांची चिंता वाढली?

राज्यात जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. मात्र पुणे, अमरावती, यवतमाळ, औरंगाबाद, ठाणे या शहरांमध्ये कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढतोय. मुंबईमध्ये सध्या कोरोना रुग्ण वाढत आहेत. तर ठाण्यात सक्रिय रुग्णांची वाढली आहे. पुण्यात सक्रिय रुग्णांची संख्या सर्वाधिक असून, हा आकडा वाढतच चाललाय. नाशिक, जळगावमध्ये सक्रिय कोरोनाग्रस्तांची संख्या वाढतीच आहे. अमरावती, नागपूर या जिल्ह्यांमध्येसुद्धा कोरोनाग्रस्तांच्या संख्येमध्ये झपाट्याने वाढ होत असल्याचं दिसत आहे. अमरावतीमध्ये कोरोनाचे सक्रिय रुग्ण वाढल्याचे निदर्शनास आलेय.

पुण्यात खासगी रुग्णालयातील 50 टक्के बेड राखीव

राज्यात पुणे जिल्ह्यात सर्वाधिक सक्रिय कोरोनाग्रस्त आहेत. त्यामुळे पुणे महापालिका खबरदारी म्हणून कठोर निर्णय घेत आहे. पुणे महापालिकेनं खासगी रुग्णालयांना बेडसंदर्भात सूचना देताना शहरातील 50 टक्के बेड राखीव ठेवण्याचे आदेश महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिले आहेत. खाजगी रुग्णालय प्रमुखांशी झालेल्या बैठकीत पालिका आयुक्तांनी शहारातील रुग्णालयांना अश्या प्रकारच्या सूचना दिल्या आहेत. खासगी रुग्णालयातील बेडची माहिती डँशबोर्डवर अपडेट करणं बंधनकारक करण्यात आली आहे. तसंच कोरोना रुग्णाला खाजगी रुग्णालयानं प्रवेश नाकारल्यास महापालिका करणार कारवाई आहे. त्यामुळे कोणत्याही कोरोना रुग्णाला नाकारण्याचं धाडस खासगी रुग्णालयांनी करु नये, अशी तंबीच पालिका आयुक्तांनी दिली आहे.

दरम्यान, राज्यात कोरोनाच्या रुग्णांत रोज वाढ होताना दिसते आहे. कालच्या तुलनेत आज 2500 जास्त कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे सध्या राज्यातील निर्बंध आणखी कडक केले जातात की काय?, असा प्रश्न सर्वांना पडला आहे. तसेच लस घेतली असली तरी पुन्हा कोरोनाचा संसर्ग होत असल्यामुळे लसीच्या परिणामकारकतेवरसुद्धा अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

इतर बातम्या :

मुंबईतील जम्बो कोव्हिड सेंटर पुन्हा सज्ज होणार, प्रत्येक वॉर्डमध्ये कोव्हिड सेंटरचीही उभारणी

पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढली, प्रशासनाकडे पुरेसे बेड्स उपलब्ध आहेत का? वाचा सविस्तर रिपोर्ट

8 Thousand 623 New Patients Of Corona Were Found In The State