
देशाच्या न्यायपालिकेत ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. न्यायपालिकेतील पारदर्शकता ठेवण्यासाठी आणखी एक पाऊल सर्वोच्च न्यायालयाने उचलले आहे. सर्वोच्च न्यायालयाने न्यायमूर्तींची संपत्ती जाहीर केली आहे. न्यायमूर्तींच्या संपत्तीची माहिती वेबसाईटवर नोंदवली गेली आहे. देशात प्रथमच न्यायमूर्तींची संपत्ती जाहीर करण्यात आली आहे. न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या निवासस्थानी नोटा सापडल्यानंतर न्यायमूर्तींची संपत्ती जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
सरन्यायाधीश संजीव खन्ना, पुढील सरन्यायाधीश बी. आर. गवई यांच्यासह 33 न्यायमूर्तींची संपत्ती जाहीर केली आहे. त्यात त्यांच्याकडे आणि परिवाराकडे असलेली फ्लॅट, घर, जमीन, बँक खाती, दागिने आदी माहिती देण्यात आली आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्याकडे साउथ दिल्लीत तीन बेडरूमचा फ्लॅट आहे. कॉमनवेल्श गेम्स व्हिलेजमध्ये दोन पार्किंग स्पेससोबक चार बेडरूमचा फ्लॅट आहे. हा फ्लॅट 2446 वर्ग फूट आहे. गुरुग्रामच्या सेक्टर 49 मधील सिसपाल विहारमध्ये चार बेडरूम असणारा फ्लॅटमध्ये 56 टक्के वाटा त्यांचा आहे. हा फ्लॅट 2016 वर्ग फूट आहे. हिमाचल प्रदेशातील डलहॉजीत वडिलोपार्जित मालमत्तेत त्यांचाही वाटा आहे. सरन्यायाधीशांनी त्यांचे बँक खाते, पीएफ खाते, शेअर्स, सोने इत्यादींची माहितीही सार्वजनिक केली आहे. त्यांनी त्यांच्या पत्नी आणि कुटुंबाच्या मालमत्तेचीही माहिती दिली आहे.
सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्या बँक खात्यात 55 लाख 75 हजार रुपये आहेत. पी.पी.एफमध्ये एक कोटी 6 लाख 86 हजार रुपये आहे. जीपीएफमध्ये 1 कोटी 77 लाख 89 हजार रुपये आहेत. एलआयसी मनी बॅक पॉलिसी वार्षिक प्रीमियम 29,625 रुपये भरतात. त्यांच्याकडे 250 ग्रॅम सोने आणि 2 किलो चांदी आहे. सोने-चांदी त्यांना वडिलोपार्जित पद्धतीने मिळाले आहे. 2015 मधील स्विफ्ट मारुती कार त्यांच्याकडे आहे. त्यांच्या पत्नीकडे 700 ग्रॅम सोने, 5 किलो चांदी, काही हिऱ्यांच्या आंगठ्या आहेत.
14 मे सरन्यायाधीश पदाची सूत्र घेणाऱ्या न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई यांनीही त्यांची संपत्ती जाहीर केली आहे. त्यांच्याकडे अमरावतीमध्ये घर आणि शेत जमीन आहे. हे त्यांना त्यांच्या स्वर्गीय वडिलांकडून वडिलोपार्जित पद्धतीने मिळाले आहे. मुंबईतील वांद्रे येथे त्यांचा फ्लॅट आहे. दिल्लीतील डिफेन्स कॉलनीत त्यांच्या फ्लॅट आहे. नागपूरमध्येही त्यांच्याकडे शेतजमीन आहे. न्यायमूर्ती गवई यांनी त्यांच्याकडे आणि त्यांच्या पत्नीकडे असलेल्या सोने, चांदी, बँक खाते याबाबतही माहिती दिली आहे.