स्वारगेट बलात्कार प्रकरणी मंत्री योगेश कदम यांनी कुणाला दिली क्लीनचिट? कुणाला धरलं दोषी?

पुण्यातील स्वारगेट एसटी डेपोमध्ये झालेल्या बलात्कार प्रकरणी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी पोलिसांना क्लीनचिट दिली आहे. त्यांनी घटनेसाठी एसटी महामंडळाने नियुक्त केलेल्या खासगी सुरक्षा रक्षकांना जबाबदार धरले आहे. कदम यांनी सांगितले की पोलिसांनी घटनास्थळी वेळेवर गस्त घातली होती. सीसीटीव्ही फुटेजमध्ये हे सिद्ध झाले आहे, असं योगेश कदम यांनी म्हटलंय.

स्वारगेट बलात्कार प्रकरणी मंत्री योगेश कदम यांनी कुणाला दिली क्लीनचिट? कुणाला धरलं दोषी?
yogesh kadam
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Feb 27, 2025 | 1:08 PM

पुण्यातील स्वारगेट (Pune Swargate Bus case) येथे एसटीत झालेल्या बलात्कार प्रकरणावरून संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेचे राज्यभर पडसाद उमटत आहेत. पुण्यात तर या प्रकरणाचा निषेध नोंदवत निदर्शने करण्यात आली आहे. आज राज्याचे गृहराज्य मंत्री योगेश कदम यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. तसेच पोलिसांशी चर्चा करून घटनेचा आढावा घेतला आहे. त्यानंतर कदम यांनी या प्रकरणात पोलिसांना क्लीनचिट दिली आहे. तर डेपो मॅनेजर आणि एसटी महामंडळाने लावलेल्या खासगी सेक्युरिटीवर या प्रकरणाचं खापर फोडलं आहे.

गृहराज्य मंत्री योगेश कदम ( Yogesh Kadam) यांनी पत्रकार परिषद घेऊन या घटनेची सविस्तर माहिती दिली. या प्रकरणात पोलिसांनी दुर्लक्ष केलं किंवा पोलिसांकडून निष्काळजीपणा झाला असं म्हणता येणार नाही. पोलिसांनी त्यांचं कर्तव्य चोख बजावलं आहे. एसटी स्टँडच्या आवारात ही घटना घडली. त्या दिवशी रात्री 12 वाजल्यापासून 6 वाजेपर्यंत पोलिसांनी किती वेळा गस्त घातली याची मी माहिती घेतली. रात्री दीड वाजता पीआयने एसटी स्टँडवर गस्त घातली होती. त्यानंतर पुन्हा रात्री 3 वाजता पीआय गस्त घालून गेले होते. सीसीटीव्हीत हे रेकॉर्ड झालं आहे. पीआय गस्त घालत असल्याचं मी स्वत: पाहिलं. सीसीटीव्हीत पीआय दिसत आहेत. त्यामुळे पोलिसांकडून दुर्लक्ष झालं असं नाही. ते अलर्ट नव्हते असं नाही. घटनेच्या पाच तासाच्या अंतरात दोन वेळा पोलिसांनी गस्त घातली होती, असं योगेश कदम म्हणाले.

जबाबदारी डेपो मॅनेजरची

पोलिसांनी एसटी स्टँडच्या इथे गस्त घातली. पण 24 तास सुरक्षा पुरवण्याचं काम हे एसटी महामंडळ काम करतं. एसटी महामंडळाने खासगी एजन्सी हायर केली होती. ही एजन्सी काम करते की नाही हे पाहण्याची जबाबदारी डेपो मॅनेजरची आहे. ही सेक्युरीटी काम करते की नाही हे पाहण्याचं काम एसटी महामंडळाचं होतं. आम्ही या मुद्दयावरून टोलवाटोलवी करत नाही. खासगी सुरक्षा यंत्रणेने व्यवस्थित काम केलं असतं तर ही घटना घडली नसती. डेपो मॅनेजरने जबाबदारी पार पाडली नाही, असं कदम यांनी सांगितलं.

बसच्या बाजूला प्रवाशी होते

परवाची ही घटना घडली. घटना घडली तेव्हा महिलेकडून कोणताही प्रतिकार झाला नसल्याचं दिसतं. घटना घडली तेव्हा बसच्या आजूबाजूला 10 ते 15 लोक होते. प्रतिकार झाला असता तर प्रवाशी धावून गेले असते. पण तसं काहीच घडलं नाही, त्यामुळे प्रवाशांच्याही लक्षात आळं नाही. त्यामुळे आरोपीने गुन्हा केला. या प्रकरणात पोलिसांचं दुर्लक्ष झालं नाही. निष्काळजीपणा घडला नाही. एसटी स्टँडच्या आवारात जी खासगी सुरक्षा होती, त्यांच्याकडे या प्रकरणाची जबाबदारी जाते, असंही त्यांनी सांगितलं.