पायात घुंगरु, ढोल-ताशांचा आवाज अन् घोड्यांनी ठरला ठेका…, Video पाहून माणूसही लाजेल
महाराष्ट्रातील नंदुरबार येथील सारंगखेडा चेतक फेस्टिव्हलमध्ये सध्या अश्व नृत्य स्पर्धेची धूम आहे. ढोल-ताशांच्या तालावर ७०० हून अधिक घोडे कला सादर करत आहेत. स्पर्धेतील विजेत्या घोड्यांना कोट्यवधी रुपये मिळतात.
देशभरातील अश्वशौकिनांना वर्षभर प्रतीक्षा करणारा सारंगखेडा चेतक फेस्टिवल सध्या सुरु झाला आहे. या फेस्टिवलसाठी अश्व नृत्यस्पर्धांना आजपासून उत्साहात सुरुवात झाली. ढोल–ताशे, हलगी आणि डफाच्या तालावर नटलेल्या मैदानात देशभरातून दाखल झालेल्या ७०० हून अधिक अश्वांनी आपल्या मनमोहक अदाकारीने प्रेक्षकांना थक्क केले. याचे अनेक व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
यातील एका व्हिडीओत एखादा माणूस ज्या पद्धतीने ढोलाच्या तालावर ताल धरून नृत्य करतो, त्याच पद्धतीने सजलेले घोडे मैदानात अप्रतिम नृत्य कौशल्य सादर करताना दिसत आहेत. यावेळी परंपरागत राजस्थानी आणि पंजाबी ढोल–ताशे आणि डफाच्या तालांवर तसेच घुंगरूंच्या लयीत घोड्यांच्या लयबद्ध हालचाली दिसत आहेत. यावेळी उंच उड्या मारत, तसेच तालासोबत ठेका धरलेले घोडे पाहण्यासाठी हजारो प्रेक्षकांनी मैदानात मोठी गर्दी केली आहे.
७०० पेक्षा अधिक घोडे दाखल
सारंगखेडा चेतक फेस्टिव्हलमधील अश्व नृत्य स्पर्धेत विजय मिळवणाऱ्या घोड्यांची किंमत लाखोंच्या घरातून थेट करोडो रुपयांपर्यंत आहे. यामुळे या स्पर्धेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. यंदाच्या स्पर्धेत ७०० पेक्षा अधिक घोडे दाखल झाले असून अनेक दमदार परफॉर्मन्स पाहायला मिळत आहेत.
कडक नियमावलीही लागू
या स्पर्धेसाठी कडक नियमावलीही लागू करण्यात आली आहे. या स्पर्धेची गुणवत्ता आणि अश्वांचे हित जपण्यासाठी यंदा कडक नियमावली लागू करण्यात आली आहे. प्रत्येक अश्वाला आपली कला सादर करण्यासाठी सात मिनिटांचा वेळ देण्यात येतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, स्पर्धेदरम्यान अश्वावर कुठल्याही प्रकारची मारहाण किंवा जबरदस्ती करण्यास सक्त मनाई आहे. नृत्य फक्त लगामीच्या सूचक इशाऱ्यावरच सादर करणे बंधनकारक आहे. नियम मोडणाऱ्या अश्व व मालकाला तत्काळ स्पर्धेतून बाद केले जाईल, असे नियम यंदा असणार आहेत.
यंदाच्या नृत्य स्पर्धेत एका विशेष अश्वाने अप्रतिम ताल नियंत्रण आणि चालींमुळे प्रथम क्रमांक पटकावला असून त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. चेतक फेस्टिव्हल अंतर्गत आयोजित या स्पर्धेमुळे सारंगखेडा घोडेबाजार पुन्हा एकदा दणाणून गेला आहे.
४०० वर्षांहून अधिक जुना इतिहास
सारंगखेडा चेतक महोत्सव हा महोत्सव महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यात तापी नदीच्या काठावर असलेल्या सारंगखेडा गावात दरवर्षी आयोजित केला जातो. सारंगखेडा घोडेबाजार हा ४०० वर्षांहून अधिक जुना इतिहास असलेला भारतातील सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या अश्व बाजारांपैकी एक आहे. हा केवळ घोडेबाजार नसून, अश्व खरेदी-विक्रीसह विविध सांस्कृतिक आणि क्रीडा स्पर्धांचा समावेश असलेला एक मोठा फेस्टिव्हल बनला आहे. या ठिकाणी देशभरातून उत्तम जातीचे घोडे, विशेषतः मारवाडी, काठियावाडी, सिंधी आणि पंजाबी नसलचे घोडे खरेदी-विक्रीसाठी येतात. यावेळी घोड्यांची आकर्षक सजावट, विविध स्पर्धा आणि त्यांची कोट्यवधी रुपयांची उलाढाल या महोत्सवाला आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्धी मिळवून देते.
ठाकरेंमुळे उन्हाळ्यातही वातावरण तापत नाही, तर थंडीत.. गायकवाडांचा टोला
राज ठाकरे यांना गुन्हा मान्य आहे का? कोर्टाच्या सवालावर थेट उत्तर
विधानसभेत बळीराजाच्या दुर्दशेवरून भास्कर जाधव यांनी सरकारला घेरलं
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? आदिती तटकरे यांनी स्पष्टच सांगितलं...

