
उद्या १ मे २०२५ पासून अनेक महत्त्वपूर्ण बदल लागू होणार आहेत. ज्याचा थेट परिणाम सामान्य नागरिकांच्या खिशावर होणार आहे. बँक खाते, एटीएम व्यवहार, रेल्वे तिकीट बुकिंग, स्वयंपाकाच्या गॅसची किंमत आणि एफडीच्या व्याजदरांमध्ये मोठे बदल अपेक्षित आहेत. त्यामुळे या बदलांची माहिती असणे तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.

एटीएममधून पैसे काढणे महागणार : उद्यापासून एटीएममधून पैसे काढणे अधिक महाग होणार आहे. येत्या १ मे पासून प्रत्येक एटीएम व्यवहारासाठी १९ रुपये शुल्क भरावे लागणार आहेत. यापूर्वी केवळ १७ रुपये भरावे लागत होते. तसेच बॅलन्स तपासण्यासाठी ७ रुपये शुल्क आकारले जाणार आहे. यापूर्वी ही रक्कम ६ रुपये इतकी होते. यामुळे आता एटीएमचा वापर जपून करावा लागणार आहे.


देशात 'एक राज्य एक आरआरबी' योजना लागू : बँकिंग क्षेत्रात मोठा बदल करण्यात आला आहे. उद्यापासून देशातील ११ राज्यांमध्ये 'एक राज्य एक आरआरबी' योजना लागू केली जाणार आहे. या योजनेअंतर्गत, प्रत्येक राज्यातील सर्व प्रादेशिक ग्रामीण बँकांचे एकत्रीकरण करून एक मोठी बँक तयार केली जाणार आहे. महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, बिहार, गुजरात, जम्मू आणि काश्मीर, कर्नाटक, मध्य प्रदेश, ओडिशा आणि राजस्थान या राज्यांचा यात समावेश आहे. या बदलामुळे बँकिंग सेवा अधिक सुलभ आणि प्रभावी होण्याची शक्यता आहे.

एलपीजी सिलिंडरच्या किमतीत बदल: दर महिन्याच्या पहिल्या तारखेला एलपीजी सिलिंडरच्या किमतींचा आढावा घेतला जातो. त्यानुसार, उद्या १ मे रोजी नवीन किमती जाहीर होण्याची शक्यता आहे. याचा परिणाम तुमच्या घरखर्चावर होणार आहे.

एफडी आणि बचत खात्याच्या व्याजदरात बदल: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) रेपो दरात दोनदा कपात केल्यामुळे, अनेक बँकांनी त्यांच्या मुदत ठेव (FD) आणि बचत खात्यांवरील व्याजदरात घट केली आहे. हे नवीन व्याजदर १ मे पासून लागू होण्याची शक्यता आहे.

एकंदरीत, १ मे पासून होणारे हे बदल तुमच्या दैनंदिन जीवनातील आर्थिक व्यवहारांवर मोठा परिणाम करू शकतात. त्यामुळे या बदलांची माहिती असणे फार महत्त्वाचे आहे.