AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raj Thackeray : शिंदे-ठाकरेंच्या शिवसेनेची चिरफाड, भाजपला बगल, राज ठाकरेंच्या भाषणातील 14 मुद्दे महत्त्वाचे

Raj Thackeray : माझ्या आजोबांचा, बाळासाहेबांचा विचार मला पुढे न्यायचा आहे. ती गोष्ट पुढे नेण्याची गरज आहे. माझ्याकडे निशाणी असली काय आणि नसली काय, नाव असलं काय नसलं काय माझ्याकडे विचार आहे.

Raj Thackeray : शिंदे-ठाकरेंच्या शिवसेनेची चिरफाड, भाजपला बगल, राज ठाकरेंच्या भाषणातील 14 मुद्दे महत्त्वाचे
शिंदे-ठाकरेंच्या शिवसेनेची चिरफाड, भाजपला बगल, राज ठाकरेंच्या भाषणातील 14 मुद्दे महत्त्वाचेImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 23, 2022 | 3:51 PM
Share

मुंबई: राज्यातील सत्तानाट्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची पहिल्यांदाच तोफ धडाडली. पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना राज ठाकरे यांनी शिवसेना (shivsena) आणि शिंदे गटाची अक्षरश: चिरफाड केली. मुख्यमंत्रीपदाच्या अडीच अडीच वर्षाच्या फॉर्म्युल्यावरून तर त्यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार तोफ डागली. सध्याच्या राजकीय परिस्थितीवरही त्यांनी घणाघाती टीका केली. आज जे सुरू आहे. ते राजकार नाही, असं सांगतानाच तरुण आणि तरुणींनी राजकारणात यावं, असं आवाहनही त्यांनी केलं. मात्र, यावेळी त्यांनी भाजपवर (bjp) टीका करणं टाळलं. भाजपवर टीका करणं टाळतानाच भाजपची बाजू मात्र त्यांनी घेतली. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना निवडणुकीसाठी सज्ज राहण्याचं आवाहन केलं. तसेच आपण स्वत: गणेश विसर्जनानंतर राज्यात मेळावे आणि सभा घेणार आहे, असं राज ठाकरे यांनी सांगितलं.

आपल्या आंदोलनाची माहिती लोकांना द्या

मला वाटतं काही गोष्टी तुमच्याकडून लोकांपर्यंत गेल्या पाहिजे. आपल्याला रोखण्यासाठी अनेक माध्यमं अनेक राजकीय पक्ष जाणून बुजून काही गोष्टींचा प्रचार करत असतात. तुम्ही सक्षम आहात. कान, डोळे, मेंदू आहे. पण उत्तर देताना तुम्ही मला भांबावलेले दिसतात. त्यांनी गेल्या काही वर्षात प्रचार केला. राज ठाकरे आणि मनसे हा पक्ष आंदोलन अर्धवट सोडतो. त्यांनी एक आंदोलन दाखवा अर्धवट सोडलेलं. टोलचं आंदोलन. 65 ते 67 टोल आपण बंद केले. सेना भाजपच्या जाहीरनाम्यात म्हटलं होतं. टोलमुक्त महाराष्ट्र करू. त्यांना कोणी प्रश्न विचारला नाही. तुमच्याबद्दल खोटा प्रचार करणार. मला वाटतं या गोष्टी तुम्ही सांगितलं पाहिजे. आम्ही एवढे टोल बंद केले. तुमच्या पक्षांनी काय केलं? आश्वासन देऊनही तुम्ही बंद केलं नाही हे सांगितलं पाहिजे, असं राज ठाकरे म्हणाले.

भोंगे आपल्यामुळेच बंद झाले

भोंग्याचं झालेलं आंदोलन. जवळपास 92 ते 93 टक्के भोंगे बंद झाले. बाकीच्या ठिकाणी कमी आवाजात प्रार्थना होतात. मी तेच पत्र दिलं होतं. फेसबुक, व्हॉट्सअप, ट्विटरवर ते पत्रं टाकू शकलो असतो. पण टाकलं नाही. तुमच्या हातात का दिलं?मला पाहायचं होतं. तुमचा आणि समाजाचा कनेक्ट कसा आहे. तुम्ही लोकांपर्यंत कसे पोहचता आणि पोहचता की नाही हे पाहायचं होतं. आमच्या पदाधिकाऱ्यांकडून पत्र दिलं नाही, असं असंख्य सैनिक सांगतात. काहींनी हलगर्जीपणा केला. तुमच्या डोक्यात निवडणुका सुरू आहेत, अशा शब्दात त्यांनी कार्यकर्त्यांचे कान उपटले.

ही तर तात्पुरती आर्थिक अॅडजेस्टमेंट

गेल्या दोन तीन महिन्यापासून जे राज्यात सुरु आहे ना ते चांगलं नाही महाराष्ट्रासाठी. महाराष्ट्रात असं कधी नव्हतं. जो मतदार आहे ना त्याने 2019ला मतदान केलं. त्याला कळतही नसेल आपण मतदान कुणाला केलं? कोण कुणात मिसळला आणि कोण कुणातून बाहेर आला काहीच कळत नाही. हे जर खरं राजकारण वाटत असेल तर हे राजकारण नाही. ही तात्पुरती आर्थिक अॅडजेस्टमेंट, सत्तेची अॅडजेस्टमेंट आहे, अशी टीका त्यांनी केली.

बाळासाहेबांनी मिठी मारली अन् मी बाहेर पडलो

माझी एका चॅनेलला मुलाखत झाली. त्यांनी राणे, भुजबळांच्या बंडाशी माझी तुलना केली. मी म्हटलं माझी तुलना त्यांच्या बंडाशी करू नका. हे सर्व जण एका पक्षात आणि सत्तेत गेले. मी बाळासाहेबांना भेटून आणि सांगून बाहेर पडलेलो आहे. जेव्हा बाळासाहेबांना कळलं हा काही पक्षात राहत नाही. तेव्हा त्यांनी मला बोलावलं. ही गोष्ट मी कधी सांगितली नाही. पण आता सांगतो. त्या दिवशी बाळासाहेबांनी मला बोलावलं. निघताना मनोहर जोशी माझ्यासोबत होते. जोशी बाहेर गेल्यावर बाळासाहेबांनी मला बोलावलं. असे हात पसरले मिठी मारली आणि म्हणाले जा… मी बाहेर पडणार हे बाळासाहेबांना समजलं होतं. त्यामुळे मी दगाफटका करून, पाठित खंजीर खुपसून बाहेर पडलो नाही. बाहेर पडून कोणत्याही पक्षात गेलो नाही. तुमच्या विश्वासावर पक्ष उभा केला, असंही त्यांनी सांगितलं.

मोबाईलमध्ये मराठी आपल्यामुळेच

आजपर्यंत आपल्या पक्षांनी जेवढी आंदोलने केली तेवढी आंदोलने कोणी केली नाही. आम्ही केली आणि ती यशस्वी केली. काढा सर्व पक्षांचा इतिहास. मोबाईलवर हिंदी आणि इंग्रजी ऐकू येत होतं. आता मराठी ऐकू येतं. ते केवळ आपल्यामुळे. माझं भाषण सुरू असताना ठाण्यात खळ्ळ असा आवाज आला. दुसऱ्या दिवशी मोबाईल कंपन्यांचं पत्रं आलं. लवकरात लवकर मराठी भाषेचा समावेश करतो. आम्ही म्हटलं लवकरात लवकर नाही. एक आठवडा देतो. एक आठवड्यात करा. आणि त्यांनी केलं, असंही ते म्हणाले.

ओवैसींना कुणी जाब विचारत नाही

नुपूर शर्मा बोलल्या. त्यांना काढून काय टाकलं. माफी काय मागायला सांगितली. मी बाजू घेतली नुपूर शर्माची. त्या मनाचं काही बोलत नव्हत्या. त्या झाकीर नाईकची मुलाखत बघा. तो मुस्लिम आहे. त्याने त्याच्या मुलाखतीत तेच सांगितलं. त्याला कोणी काही माफी मागायला सांगितलं नाही. दोन हरामखोर भाऊ ओवैसी. त्यातील एक जण आमच्या देवीदेवतांवर बोलतो. तो आमच्या देवी देवतांना मनहूस म्हणतो. त्याला कुणी या देशाते माफी मागायला सांगितलं नाही. या देशात अनेक चांगले मुसलमान आहेत. यांच्या सारखे दरिद्री नाही. पण यांना कोणतंही सरकार चाप लावायला तयार नाही. त्याच्या जीभेला कोणी टाळं लावत नाही. कवी इक्बाल हिंदुस्थान म्हणतो. आणि आम्ही हिंदू भारत बोलतोय. नाही तर इंडिया बोलतो, असा संतापही त्यांनी व्यक्त केला.

मुख्यमंत्रीपद मागताच कसं?

2019ला निवडणुका झाल्या भाजप-सेना एकत्र लढले. त्यानंतर फारकत घेतली. अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद मिळावं या मुद्द्यावर वेगळं झाला. मला अजूनही आठवतं. मला माहीत आहे. मी त्या बैठकीला असायचो. सेंटार हॉटेल किंवा घरी बैठका व्हायच्या. बाळासाहेब, मनोहर जोशी, वहाडणे, मुंडे, महाजन यांच्यात एक गोष्ट ठरली. ज्यांचे जास्त आमदार, त्यांचा मुख्यमंत्री. ही गोष्ट तुमच्यात ठरली आहे. तर 2019ला तुम्ही मागणी करूच कशी शकता? कमी आमदार आल्यावर. म्हणे कमिटमेंट केली. चार भिंतीत कमिटमेंट घेतली. माणसे दोनच. ज्याचे जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री हे ठरलेलंच आहे तर तुम्ही मुख्यमंत्रीपद मागताच कसं?, असा सवाल त्यांनी उद्धव ठाकरे यांना नाव न घेता केला.

हिंमत होतेच कशी?

पंतप्रधान मोदी जेव्हा भाषण करायचे. त्या मंचावर उद्धव ठाकरे बसलेले असायचे. सत्ता येईल तेव्हा देवेद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील हे मोदी आणि शहा उद्धव ठाकरेंसमोरच सांगायचे. तेव्हाच आक्षेप का घेतला नाही? त्यावेळीच त्यांना फोन का केला नाही? सर्व निकाल लागल्यावर तुम्हाला आठवलं? याचं कारण या सर्व गोष्टींची बोलणी आधी पासून सुरु असणार. लोकांनी मतदान कुणाला केलं होतं. दोन्हीकडच्या मतदारांना काय वाटलं असेल? सेना भाजप नको म्हणून मतदान केलं. तुम्ही त्यांच्यासोबत गेला. भाजप सेनेच्या मतदारांना वाटत असेल दोन्ही काँग्रेस नको म्हणून तुम्हाला मतदान केलं. ते नकोत म्हणून मतदान केलं आणि तुम्ही त्यांच्यासोबत जाता. ही हिंमत होते कशी?, असा सवाल त्यांनी केला.

राजकारणाला खेळाचा दर्जा दिला

जेव्हा लोकं शासन करत नाही. शिक्षा करत नाही. तेव्हाच ही हिंमत होते. आम्ही तुम्हाला मतदान करणार नाही. तुम्ही आमच्या मतांची किमत केली नाही. तुम्ही प्रतारणा करता हे सांगत नाही. तोपर्यंत महाराष्ट्राच्या नशिबी हेच राहणार आहे. राजकारण हा गंभीर विषय आहे. या सरकारच्या भाषेत आपण राजकारणाला खेळाचा दर्जा दिला आहे. दहीहंडीलाही दर्जा दिला. आता मंगळागौरला देतील. लग्न झाल्या झाल्या हार घातल्यावर खेळाचा दर्जा दिला पाहिजे, असा चिमटाही त्यांनी काढला.

ते स्लो पॉईजन देत आहेत

चांगल्या क्षेत्रातील महिलांनी पुरुषांनी राजकारणात आलं पाहिजे. मी याबाबत एक पत्रं काढणार आहे. राजकारण खूप विस्तारलेलं आहे. फक्त निवडणुका ही गोष्टच नाही. राजकारणाला तुम्ही तुच्छ मानता आणि त्यासाठीच दोन दोन तास रांगेत उभं राहून मतदान करता. मग तुच्छ कसं? आपल्याकडे कीड लागली आहे. जातीच्या, धर्माच्या नात्याच्या नावाने मतदान करत असतो. आपल्या राज्याने देशाला मार्गदर्शन केलं. यूपी बिहारसारखं राजकारण आपल्या राज्यात घुसत आहे. सर्वांना मत मागणाऱ्यांना जाब विचारला पाहिजे. आपल्याविरोधात प्रचार करतात. स्लो पॉईजन देत आहेत. ते तिथेच छाटा. माझं भाषण मुलाखतीत मी जे बोलतो त्याचे मुद्दे काढा. त्याचा प्रचार करा. लोकांना ते सांगा. फक्त आंदोलन करून चालत नाही. तुम्ही प्रमुख पदावर आहात. त्या पदाची शान राखा, असा सल्लाही त्यांनी दिला.

तर पक्षातून काढून टाकू

पदाधिकाऱ्याने पक्षातल्या पक्षात व्हॉट्सअप सोशल मीडियात फेसबुकवर कोणत्याही प्रकारच्या कमेंट केल्या तर त्याला एकक्षणही पक्षात ठेवणार नाही हे लक्षात ठेवा. तुमचे चोचले खूप पुरवले. झालं तेवढं खूप झालं. तुमचं काम सागायचं असेल तर त्या माध्यमाचा उपयोग करा. जर उणीदुणी काढत असाल तर… काढून तर बघा. कुणी जर काढलं असेल तर माझ्यापर्यंत ते पोहोचलं पाहिजे, असंही त्यांनी सांगितलं.

प्रभाग पद्धतीवर टीका

निवडणुका कधी होतील माहीत नाही अग अग म्हशी हेच चालू आहे. निवडणुका कधीही लागतील. दिवाळीच्या आधी लागतील असं वाटत नाही. नोव्हेबंर, डिसेंबर कदाचित जानेवारी आणि फेब्रुवारीतही लागतील. चिखल झालाय. कारण कोणी विचारणारा नाही. आता जिल्हा परिषदा पुढे ढकलल्या. महापालिकेचे प्रभाग तीनचे की दोनचे. वॉर्डाला तीन माणसं, चार माणसं. लोक काय गुलाम आहेत का? त्यांना नगरसेवकही माहीत नसतात. चार चार माणसांचा प्रभाग करताय. तो भाग कोणी बघायचा. कुणाला कळत नाही. कुठे जावं. कारण लोक जाब विचारत नाही. एकदा लोकांनी ठरवलं पाहिजे. खेळ मांडलाय नुसता. गृहित धरलंय लोकांना, असंही त्यांनी सांगितलं.

माझ्याकडे विचार आहे

पेशव्यांनी सर्व सत्ता काबीज केली. पण त्यांनी कधीच स्वत:ला छत्रपती म्हणून घेतलं नाही. छत्रपती एकच शिवाजी महाराज, गादी तीच, आम्ही फक्त नोकर असं पेशवे म्हणायचे. आम्ही फक्त त्यांचा विचार पोहोचवतोय. माझ्या आजोबांचा, बाळासाहेबांचा विचार मला पुढे न्यायचा आहे. ती गोष्ट पुढे नेण्याची गरज आहे. माझ्याकडे निशाणी असली काय आणि नसली काय, नाव असलं काय नसलं काय माझ्याकडे विचार आहे. सर्वात मौल्यवान गोष्ट असेल तर माझ्याकडे विचार आहे. बाकी सगळं सोडा. पण त्याबाबतीत मी श्रीमंत आहे. आणि या महाराष्ट्रात ज्या महापुरुषांनी विचार पेरले. ते ऐकणं, त्यातून बोध घेणं. ती गोष्ट सर्वांनी केल्या पाहिजे. तर या गोष्टी टिकतील, असंही ते म्हणाले.

निवडणुकात अॅडजेस्टमेंट करू नका

माझी हातजोडून विनंती आहे. निवडणुकात अॅडजेस्टमेंट करू नका. हात जोडतोच. अॅडजेस्टमेंट करून निवडणुका लढवू नका. शून्य किंमत होईल तुमची. या गोष्टी लपून राहत नाहीत. त्या बाहेर येतील. या निवडणुका तुम्ही ताकदीने लढवा. आम्ही तुम्हाला ताकद देऊ. मला शक्य होईल तिथे सभा घेईल. अनेक ठिकाणी मेळावे सुरू करणार आहे. अनंत चतुर्दशी झाल्यावर मी मेळावे घेणार आहे, असं त्यांनी सांगितलं.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.