Bhushan Gavai : जिथे वडिलांनी लोकप्रतिनिधित्व केलं, तिथेच गवईंचा सत्कार; व्यक्त केल्या भावना
Maharashtra Legislature : विधानमंडळातर्फे आज भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचा महाराष्ट्र सत्कार करण्यात आला.
भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचा महाराष्ट्र विधानमंडळातर्फे आज सत्कार करण्यात आला. या समारंभाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यासह विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहांतील सदस्य उपस्थित होते. यावेळी बोलताना गवई यांनी हा सत्कार आपल्यासाठी विशेष असल्याचे सांगितले. ते म्हणाले, याच विधानमंडळात माझ्या वडिलांनी अनेक वर्षे लोकप्रतिनिधी म्हणून काम केले आहे. त्याच सभागृहात माझा सत्कार होणे ही माझ्यासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे.
यावेळी गवई यांनी भारतीय संविधान आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर प्रकाश टाकला. ते म्हणाले, संविधान तयार करताना बाबासाहेबांचे विचार सामाजिक आणि आर्थिक एकतेवर केंद्रित होते. त्यांनी पंडित नेहरू यांच्याकडून अधिक अपेक्षा व्यक्त केल्या होत्या. बाबासाहेबांचा विश्वास होता की, संविधानात सामाजिक आणि आर्थिक एकतेची तरतूद असायला हवी होती. बाबासाहेब खऱ्या अर्थाने राष्ट्रीयत्व जपणारे व्यक्तिमत्त्व होते. ‘मी प्रथम आणि शेवटचा भारतीय आहे, असे त्यांचे उद्गार होते. गवई यांनी या आठवणी सभागृहात सांगत बाबासाहेबांच्या विचारांचा गौरव केला.
