
आजच्या धावपळीच्या जीवनात पती-पत्नीच्या नात्यात तणाव निर्माण होणे स्वाभाविक आहे. मात्र अनेकदा या समस्यांचे मूळ वास्तुशास्त्रात दडलेले असते. घरात नकळतपणे केलेल्या काही वास्तुदोषामुळे वैवाहिक जीवनात कटुता निर्माण होते. त्यामुळे परिस्थिती इतकी बिघडते की घटस्फोटाची वेळ येते.

वास्तुशास्त्रज्ञांच्या मते, विशिष्ट दिशा आणि रंगांमधील चुका थेट नातेसंबंधांवर नकारात्मक परिणाम करतात. त्यामुळे आपण आज काही प्रमुख वास्तुदोष आणि त्यावरचे उपाय जाणून घेणार आहोत. जे वैवाहिक जीवनातील अडचणी दूर करण्यास मदत करू शकतात.

वास्तूनुसार, ईशान्य दिशेला असलेली बेडरूम अत्यंत अशुभ मानली जाते. या दिशेमुळे घरात नकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो. ज्यामुळे पती-पत्नीमध्ये मानसिक आणि भावनिक अशांतता निर्माण होते. तसेच संबंधांमध्ये दुरावा येऊ शकतो.

नैऋत्य (Southwest) दिशा झोपण्यासाठी सर्वोत्तम मानली जाते. याउलट, जर घराची दक्षिण बाजू नेहमी अंधारी, खूप थंड असेल किंवा त्या भागात इलेक्ट्रिक पॅनेल बसवलेले असेल, तर त्याचा थेट परिणाम पत्नीच्या विश्वासावर होतो. यामुळे पत्नीचा पुरुषावरील विश्वास कमी होऊ लागतो.

घराच्या दक्षिण भागात जर जास्त प्रमाणात निळा किंवा पांढरा रंग असेल, तर पुरुषाला त्यांच्या पत्नीबद्दल अस्वस्थता जाणवू लागते. हे वास्तुदोष वैवाहिक जीवनातील सुसंवाद बिघडवून घटस्फोटाचे कारण बनू शकतात.

वैवाहिक जीवनात स्थिरता आणि प्रेम टिकवून ठेवण्यासाठी, बेडरूम नेहमी नैऋत्य दिशेला असावी. तसेच घराचा आग्नेय भाग नेहमी उबदार ठेवावा. हा भाग ऊर्जा आणि संबंधांमधील उत्कटता टिकवून ठेवण्यास मदत करतो.

वैवाहिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी, पाच गोमती चक्रे सिंदूरच्या पेटीत ठेवून ती पूजास्थळी ठेवावीत. दररोज प्रार्थनेनंतर, महिलांनी त्यांच्या कपाळावर सिंदूर लावावा आणि पुरुषांनी त्यावर टिळक लावावे. या उपायांमुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होऊन पती-पत्नीमधील संबंध अधिक मजबूत होतात.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)