Anjali Damania : शिंदेंच्या ठाण्यात 15 डान्सबार… एका वेळेस 40-50 बायका नाचतात अन्… दमानियांचा घणाघात
'योगेश कदम यांना ज्यावेळी मी पहिल्यांदा भेटले तेव्हा तो माणूस मला योग्य वाटला पण वडिलांच्या मेहरबानीने अनेक गोष्टी होत असतात. सावली बारमध्ये जाऊन ज्यावेळी त्याचा परवाना बघितला, एफआरआय वाचला तेव्हा असं लक्षात आलं की ज्योती कदम या नावाने त्या बारचा परवाना आहे. हा परवाना असताना त्यांना तो कोणाला द्यायचा होता तर तो रद्द करून नवा परवाना काढणं गरजेचं होतं पण तसं झालं नाही.'
डान्स बार प्रकरणात आरोपांची राळ उठलेल्या राज्याच्या गृहराज्यमंत्री योगेश कदम यांना राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साथ देत त्यांची पाठराखण केल्याचे पाहायला मिळत आहे. योगेश चिंता करू नको, मी तुझ्या पाठिशी आहे, असं वक्तव्य एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय. यावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ‘एकनाथ शिंदे मागे एकदा अधिवेशनात म्हणाले होते की मी 50 डान्सबार बंद केले वगैरे… मी गृह मंत्रालयाकडे 15 डान्सबारची लिस्ट पाठवली जे सर्रासपणे ठाण्यात चालतात. त्याचे व्हिडिओ आणि डिटेल्स गृहमंत्रालयाकडे पाठवलं होतं आणि ते शिंदेंच्या ठाण्यात चालतात’, असं अंजली दमानिया म्हणाल्या,
पुढे त्यांनी असेही सांगितले की, या बारमध्ये एका वेळेस 40 ते 50 बायका नाचतात याचे व्हिडिओज देखील गृह मंत्रालयाकडे मी पाठवलेत. त्याचा उलगडा सुद्धा होईलच, तिथे सुद्धा रेड पडल्यावर एकदा शिंदे काय बोलतात काय वागतात आणि खरी परिस्थिती काय? हे सगळं जाहीर होईल असा दावा दमानियांनी केलाय. इतकंत नाहीतर जर राज्याच्या गृहमंत्र्यांच्या आईच्या नावे जर असे डान्सबार चालत असतील तर ते महाराष्ट्रासाठी योग्य नसल्याचेही त्यांनी म्हटलंय.
